दिनांक ११ नोव्हेंबर २०२० रोजी सायं ८ वा. च्या सुमारास फिर्यादी जावेद खुतबुद्दीन नदाफ, वय २१ वर्षे, रा.माळेवाडी, ता. माळशिरस हे मित्रासह टेंभूर्णीहून अकलूजकडे ओमनी गाडीतून जात असताना वाफेगाव फाट्याजवळ आले असता पाठीमागून मोटार सायकलवर आलेले दोन इसमांनी गाडीला कट मारल्याचा जाब विचारण्याचा बहाणा करून ओमिनी थांबवून फिर्यादी व त्यांचे मित्राचे डोळ्यात चटणी टाकून त्यांचेकडील रोख रक्कम १,२५,हजार रूपये जबरीने चोरून नेलेबाबत अकलूज पोलीस स्टेशनला भा.द.वि.क. ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
त्याचप्रमाणे दिनांक २८ डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी ०८/२० च्या सुमारास टेंभूर्णी पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी नामे ज्ञानेश्वर अनंत वास्ते, वय ४३ वर्षे, रा. मोडनींब, ता. माढा, व त्यांचे पिकअप वरील चालकासह अकलूज येथून कपडे विक्री करून त्यापासून आलेली रक्कम घेवून पिक-अपमधून टेंभूर्णी मार्गे मोडनिंबकडे जात होते. ते टॅभुर्णीजवळील वृद्धाश्रम जवळ आले असता पिकअपचे पाठीमागून येणारे हिरो होंडा पॅशन प्रो मोटरसायकल वरून तीन इमसांनी येवून गाडीला कट का मारला असा बहाणा करून फिर्यादीस शिवीगाळी करून चाकूचा धाक दाखवून त्यांना पिकमधून रांझणी गावाकडे घेवून जावून त्यांचेकडील ४४,८६० रुपये जबरदस्तीने चोरून घेऊन गेलेबाबत टेंभूर्णी पोलीस स्टेशन येथे भा.द.वि.क. ३९२,३६३,३४१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल होता.
सोलापूर ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सदरचे दोन्ही गुन्हे हे टेंभूर्णी ते अकलूज रोडवर घडले होते तसेच आरोपींची गुन्हा करण्याची पध्दती पाहता रस्त्याने जाणारे वाहनांना गाडीला कट का मारला अशी विचारणा करत वाहन थांबवून मारहाण करून चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी करण्याची असल्याने स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांना या मार्गावर गुन्हे करणारे आरोपींचा छडा लावणेबाबत आदेश दिले होते. त्याप्रमाणे पोनि पाटील यांनी या मार्गावर गुन्हे करणारे आरोपींचा शोध घेण्यासाठी खास पथक नियुक्त केले होते. त्यावरून असे गुन्हा करणारे आरोपींची गोपनिय माहिती काढून त्यातील दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे त्यांचेकडे तपास करता आरोपींनी हे गुन्हा केल्याचे कबूल केले आहे. आरोपींना सद्या टेंभूर्णी पोलीस स्टेशनच्या गुन्हयात तपासकामी वर्ग करण्यात आले आहे. सदरची कामगिरी तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, अतुल झेंडे, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण व यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक रविंद्र मांजरे, सहा.फौ. संदीप काशीद, पोह बिराजी पारेकर, पोह श्रीकांत गाकयवाड, पोह सलीम बागवान, पोना बापू शिंदे, पोना लाला राठोड, सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीणयांनी पार पाडली आहे.



















