सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मंगळवारचा आपला दिवस वडाळा गावाला दिला. वडाळा गावाला जाण्याच्या एक दिवसांपूर्वी झेडपी आढावा बैठक झाली.
ऑनलाइन सभा नको, नको म्हणून ओरडणाऱ्या सदस्यांची मर्जी राखण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी अखेर ऑफलाईन पद्धतीने घेण्यास होकार दिला. त्यामुळे 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशीच आढावा बैठक होती. काही सदस्यांचा त्या दिवशी मूड रोमँटिक होता. सभा अशाच मूडमध्ये होईल असे चित्र होते. परन्तु त्यावर सुभाष माने यांनी पाणी फेरले.
स्वच्छ व सुंदर शाळा या उपक्रमातील पुरस्कार निवडीवर त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. ते या विषयावर तुटून पडले, इतर अनेक सदस्यांनी संधी साधली आणि माने यांच्या बाजूने आणि प्रशासनाच्या विरोधात आक्रमक झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून एवढे कौतूक झाले असतानाही सदस्यांच्या अशा भूमिकेवर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तीव्र नाराज झाले, बराच वेळ ऐकून घेतल्यावर त्यांनी ही चवताळून उत्तर दिले, कुणालाही बोलू दिले नाही, समोरच्यांची तोंडे बंद केली.
परत सभागृहात उत्तर पंचायत समिती बीडीओ पायघड्या स्वागत प्रकरण, डिजिटल शाळा प्रकरण, आरोग्य विभाग टार्गेट, 15 वित्त आयोग निधी खर्च प्रकरण समोर आले. या सर्वात प्रशासन टार्गेट होते, दिवसभर सभागृहात दिलीप स्वामी उत्तर देऊन दमल्याच चित्र होतं.
दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी त्यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकांदे व मुख्य वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार हे तिघे एकाच गाडीत व्हिजिटला नेमके कुठे गेले हेच कुणाला समजले नाही. नंतर वडाळा गावातील व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वाना समजले. स्वामी यांनी दिवसभर वडाळ्यात घालवत, सुरुवातीला ग्रामपंचायत मध्ये रेकॉर्ड रूमची पाहणी केल्यानंतर स्मशानभूमी येथील शरद वन पाहणी केली,मारुती मंदिर व गणेश मंदिर पाहणी केली . तसेच वडाळ्यातील शाळा व कॉलेजची सुद्धा पाहणी करत 10 मिनिटे शिक्षक व प्राचार्यां बरोबर गप्पा मारल्या.
यावेळी स्वामींनी आपले मित्र प्रेम जपले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जिल्हा परिषदेतील ऑनलाइन कार्यक्रमाला अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते काका साठे यांना प्रशासनाने एका तालुकाध्यक्षा मार्फत निमंत्रण दिले गेले, त्या तालुकाध्यक्षाने आपल्या नेत्याला सांगितले नाही. अजित पवारांच्या कार्यक्रमात काकांना प्रशासनाकडून व्यवस्थित वागणूक मिळाली नाही, त्याच्या बातम्या छापून आल्या. सीईओ स्वामींच्या एवढा जवळ हे तालुकाध्यक्ष कसे गेले असे प्रश्न उपस्थित झाले, जिल्हाध्यक्ष पेक्षा तालुकाध्यक्ष मोठा कसा?असा प्रश्न दैनिकांनी उपस्थित केला. याची चर्चा संपूर्ण झेडपीत, वडाळ्यात, उत्तर तालुक्यात नाही तर जिल्ह्यात झाली होती. वडाळा दौऱ्यात स्वतः साहेबांनी त्या तालुकाध्यक्ष मित्राला वडाळ्याला बोलवले होते अशी माहिती कार्यकर्त्यांकडून मिळाली.
आपल्या मित्राचा कार्यक्रम होऊ नये म्हणून सीईओ स्वामींनी करेक्ट टायमिंग साधला. काकांच्या कामांवर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. काकांना खुश करण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून आले.
जिल्ह्यातील सर्वात ज्येष्ठ जिल्हा परिषद सदस्य, माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, विद्यमान विरोधी पक्षनेते काका साठे यांनी ऑनलाइन सभेला विरोध केला होता. परंतु सोमवारी सभागृहात ऑफलाईन पद्धतीने आढावा बैठक झाली. त्याला मात्र काका साठे यांनी दांडी मारली होती.

















