सोलापूर – कुंभारी येथील गोदूताई परुळेकर नगर मधील अंतर्गत रस्ते सुधारणा ग्रामीण मार्ग क्रं 19 विजय नगर ते गोदूताई क्रांती चौक व ग्रामीण मार्ग क्रं 18 क्रांती चौक ते साखर कारखाना या रस्त्यांचे काम चांगले, गुणवत्तापूर्ण झाले पाहिजे, नियोजित वेळेत काम पूर्ण करावे तसेच कोणतीही समस्या अथवा तक्रार येता कामा नये अशा शब्दांत संबंधित अधिकारी व ठेकेदार यांना रस्त्याच्या कामाचा शुभारंभावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आदेश दिले.
बुधवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी कुंभारी येथे कॉ.गोदूताई परुळेकर नगर मधील मुख्य रस्ते ग्रामीण मार्ग 18 व 19 रस्त्याच्या कामाचा शुभारंभ कार्यक्रम संस्थेचे संस्थापक मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अध्यक्षीय भाषणात आडम मास्तर म्हणाले, अथक परिश्रम व संस्थेच्या पाठपुराव्यामुळे आज या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून या कामी जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर तसेच संबंधित अधिकारी आदींनी सहकार्य केले त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी संस्थेचे प्रभारी युसूफ शेख यांनी प्रास्ताविक केले. सिटूचे राज्य महासचिव अँड.एम.एच.शेख, पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी शुभेच्छा संदेश दिले.
यावेळी क्रांती चौक ते पारधी वस्ती हा रस्ता जिल्हा नियोजन व जिल्हा विकास परिषद मधून रस्ता मंजूर करण्यासंबंधी स्वामी समर्थ महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेचे प्रवर्तक मुरलीधर सुंचू यांनी मा.जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.
यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त मुख्य कार्य अधिकारी संतोष धोत्रे,कार्यकारी अभियंता जि.प.मा.सुनिल कटकधोंड,उप कार्यकारी अभियंता खैरादी, सोनकांबळे, कुंभारीचे सरपंच श्रुती निकंबे, कुंभारीचे उपसरपंच सुरज पाटील, वळसंग पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक अतुल भोसले, नगरसेविका कामिनी आडम,घरकुल अ,ब,क तसेच मीनाक्षी सानेचे चेअरमन सुनंदा बल्ला,शकुंतला पाणीभाते, फातिमा बेग,यशोदा दंडी,नसिमा शेख,
विल्यम ससाणे, वसीम मुल्ला, बापू साबळे, हसन शेख, आप्पाशा चांगले, विक्रम कलबुर्गी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अनिल वासम यांनी केले.




















