सोलापूर : जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 बाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस आयुक्त शिरीष सरदेशपांडे, प्रभारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, जिल्हा नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत मिळालेला निधी यंत्रणांनी गांभीर्याने व विहित वेळेत खर्च करावा. त्यासाठी मान्यता व अन्य कार्यवाही प्राधान्याने करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. शंभरकर यांनी यावेळी दिले.
जिल्हा वार्षिक योजना सन 2022-23 च्या कार्यान्वयनास झालेला विलंब, लवकरच होणा-या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यात लागणारी आचारसंहिता इत्यादींचा विचार करता मार्च 2023 अखेरपर्यंत निधी खर्च करण्यासाठी कमी कालावधी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर या बैठकीत यंत्रणास्तरावर निधी खर्च करण्याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच, यापूर्वी पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपस्थित मुद्यांचे कार्यपालन अहवालांबाबत (Action Taken Report) आढावा घेण्यात आला. याबरोबरच, जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण सन 2023-24 करिता प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी करावयाच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यात आला.


















