सोलापूर- मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कोणतेही आंदोलन असो मग ते जेलभरो, रास्ता रोको, धरणे आंदोलन, मोर्चा, ठिय्या, घेराव, पुतळा दहन अशा विविध आंदोलनाच्या सुरुवातीला महाराष्ट्रातल्या लोक कलावंताचा व शाहिरांचा वारसा जपणाऱ्या प्रजानाट्य मंडळाचे कलावंत चळवळीतील क्रांतिकारी गाणी सादर करून जनसमुदायात स्फुलिंग चेतवतात. त्या कलापथकात डफावर थाफ देताना बेभान होऊन डफ वाजवणारे तसेच आंदोलनात भाग घेणाऱ्या आघाडीवरच्या कार्यकर्त्यांत नेहमीच अग्रेसर राहणारे लढाऊ कार्यकर्ते म्हणून कॉम्रेड अनिल वासम हे मार्क्सवादी विचारवंत, लढवय्या ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम (मास्तर) यांच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित झाले.
अगदी शाळकरी वयापासूनच चळवळीत सक्रीय होऊन मार्क्सवादी विचारधारा अंगिकारले. या दरम्यान शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि सर्वाना शिक्षण आणि सर्वाना रोजगार DYFI चा नारा घेऊन आपले शिक्षण अविरतपणे चालू ठेवले. चळवळीतला कार्यकर्ता ते LLB पर्यंतचा प्रवास हा अत्यंत संघर्षमय आणि प्रेरणादायी आहे.
कुटुंबात आई-वडील अशिक्षित असताना सुद्धा आपला मुलगा शिक्षित झाला पाहिजे. यासाठी वडील अंबादास वासम हे यंत्रमाग कामगार आणि आई लक्ष्मी वासम विडी कामगार या दोघांनी मुलाच्या शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले.
ते पहिल्यांदा श्रीदत्त बालमोहन विद्यालय येथे प्राथमिक शिक्षण तर सोलापूर महानगरपालिका प्रशाला क्र.३ माध्यमिक शिक्षण, कुचन कनिष्ठ महाविद्यालय येथे उच्चमाध्यमिक शिक्षण, दयानंद महाविद्यालय येथून कला शाखेची पदवी त्यानंतर वालचंद कला व महाविद्याल येथे अर्थशास्त्र विषयात पद्व्युत्तर शिक्षण क्रम पूर्ण केले. या दरम्यान यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून वृतपत्र विद्या व जनसंज्ञापन याची पदवी मिळविले. तसेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळामार्फत ग्रंथपाल पदविका मिळविली.
नुकतेच ते दयानंद विधी महाविद्यालय येथून LLB शिक्षण क्रम उत्कृष्टश्रेणीत उत्तीर्ण झाले. असा हा शैक्षणिक प्रवास करणारा कॉ. अनिल वासम समाजामध्ये मुक्त पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, लढाऊ चळवळीतला कार्यकर्ता अशी ओळख असणाऱ्या कॉम्रेडला इथून पुढे वकीलसाब म्हणून संबोधतील.
कॉ.अनिल वासम यांना आपल्या शैक्षणिक प्रवासात अनेकांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले असल्याचे सांगण्यात येते.
अनिल वासम यांना शालेय जीवनापासून वाचन,लेखन आणि भाषणाची आवड असून भाषणे ऐकण्याचा छंद आहे. शालेय व महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, काव्यलेखन व काव्यवाचन स्पर्धेत सहभागी होत असत.यामध्ये अनेक पारितोषिके ही मिळवली आहेत.
अँड.एम.एच.शेख,अँड.मोहन कुरापाटी,अँड.सत्यनारायण माने, अँड.हेमंतकुमार साका, अँड.मनोज पामुल, अँड.श्रीनिवास क्यातम, मधुकर जक्कन, डॉ.आशालता जगताप,हारुन बंदूकवाले, ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी,श्रीनिवास कोडम यांचे सतत प्रोत्साहन मिळत गेले.
अनिल वासम यांची पत्नी गीता या परिचारिका असून चळवळीत व्यस्त असणाऱ्या वासम यांना कौटुंबिक जबाबदारीचे कोणतेही ताण न टाकता सक्षमपणे मुलांचे शिक्षण,संगोपन व घरातील व्यवस्थापन करत मदत करतात.कामगार चळवळ करताना तुरुंगात ही जावे लागले.आजमितीला 50 च्या घरात पोलिसांनी सामाजिक व राजकीय खटले दाखल केले आहेत. कोर्ट आणि पोलीस ठाण्यात गोर गरीब श्रमिकांची व निष्पापांची होणारी होरपळ पाहून चीड येत असे यामुळे न्यायाची लढाई लढण्याकरीता वकिली शिक्षण घेण्याची प्रेरणा निर्माण झाली आणि LLB चा प्रवास सुरु झाला.
याकामी महाविद्यालयात प्रा.मल्लिकार्जुन हिंगमीरे, गायकवाड मॅडम,दंतकाळे मॅडम,चौधरी मॅडम, कटाप सर, रवी चलवादी सर, अरविंद देडे सर यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच बरोबर केशव इंगळे,प्रशांत कांबळे, भरत जाधव, संतोष म्हमाणे किरण गायकवाड,लता कैरमकोंडा,शाम आडम आदींची भक्कम साथ मिळाली.


















