सोलापूर : उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ग्रामसेवकांना राज्य शासनाकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्कार दिला जातो. सोलापूर जिल्हा परिषदेमधून सन 2020-21 व सन 2021-22 या दोन वर्षाच्या पुरस्कारासाठी प्रत्येकी एक अशी दोन नावे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये 2020-21 साठी किरण वाघमारे (यावली ता.बार्शी) तर 21-22 साठी संजय शिंदे (ब्रह्मपुरी ता. मंगळवेढा) यांचा समावेश आहे.
यापूर्वी पुणे जिल्हा परिषदेने एका वर्षासाठी 2 ग्रामसेवकांची नावे पाठवली होती त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा परिषदेने दोन वर्षासाठी 2-2 नावे पाठवावी अशी मागणी ग्रामसेवक संघटनेकडून होत आहे. विशेष म्हणजे प्रभारी सीईओ संदीप कोहिनकर हे पुणे जिल्हा परिषदेला ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी असताना हे झाले होते.
अशी माहिती आहे की, सन 2021-22मध्ये तपासणीसाठी प्रस्ताव दिलेला नसताना संजय शिंदे यांचे 21-22 च्या पुरस्कारासाठी नाव पाठवले आहे.
गुरुवारी पत्रकारांनी सीईओ कोहिनकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्याशी याप्रकरणी चर्चा केली असता शेळकंदे म्हणाले, पुरस्कारासाठी 7 प्रस्ताव आले होते, सर्व रेकॉर्ड पडताळणी करून गुण दिले आहेत. गुणाबाबत तक्रार असेल तर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करावी, पडताळणी कुणाच्या शिफारस नुसार केलेली नाही, विभागून पुरस्कार देण्याची मागणी योग्य नाही, जिल्हास्तरीय पुरस्कार विभागून ठीक आहे, मात्र राज्यस्तरावर योग्यच नाही, चुकीचा पायंडा पडू शकतो अशा भूमिकेवर ते ठाम दिसले.


















