सोलापूर : एखाद्या मानवास वेगळ्या प्रकारचा आजार झाल्यास आपण त्यांना समाजातून दूर करतो हे चुकीचे आहे. मानवाच्या जीवनात आजार येतात व जातात अशा वेळेस आजार दूर करा मानवास दूर करू नका.मानव हा समाजप्रिय आहे .एका माणसाने दुसऱ्या माणसास समजून घेऊन समाजात राहिले पाहिजे असे प्रतिपादन धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी यांनी केले.
कुमटे नाका येथील शासकीय कुष्ठरोग वसाहत मध्ये रुग्णांना त्यांच्या हस्ते चादरी वाटप करण्यात आल्या त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी धर्मादाय कार्यालयातील सहाय्यक धर्मादाय आयुक्त रेणुका गायकवाड, अधीक्षक सत्यजित कुमठेकर, निरीक्षक शिवाजी शिंदे ,लेखापाल शामराव चव्हाण ,बेलीप बाळासाहेब दांडगे, शिपाई सुभाष रणशूर तर सार्वजनिक आरोग्य विभागातील सहाय्यक संचालक कृष्ठरोग डॉ. अनिरुद्ध पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मोहन शेगर, डॉ. एकनाथ बोधले, रुग्ण कल्याण समिती समन्वयक प्रदीप नामदे, वैद्यकीय अधिकारी उमा झाड, अवैद्यकीय पर्यवेक्षक विक्रांत सोळुंकी, शैलजा जोशी, अवैद्यकीय सहाय्यक जगन्नाथ ढगे यांच्यासह कुष्ठरोग विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
पुढे बोलताना धर्मादाय उपायुक्त सुनीता कंकणवाडी म्हणाल्या, या वसाहतीमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांसाठी मी शासन स्तरावर व वैयक्तिक स्तरावर यापुढेही मदत करत राहणार असल्याचे सांगत रुग्णांसाठी लागणाऱ्या औषध गोळ्याचांही पुरवठा करणार असल्याचे त्यांनी यावेळी आश्वासन दिले. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या दोनशे रुग्णांना कार्यक्रमाप्रसंगी चादरीचे वाटप करण्यात आले.
सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत कृष्टरोग वसाहती मधील रुग्णांसाठी शासनामार्फत कोणकोणत्या योजना राबवल्या जातात याबाबतची माहिती सहाय्यक संचालक डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांनी दिली. मीना शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर या संस्थेचे अध्यक्ष सतीश दरेकर व शिवाजी शिक्षण संस्था गौडगाव तालुका बार्शी या संस्थेचे कार्यक्रमास मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जगन्नाथ ढगे तर आभार प्रदर्शन प्रदीप नामदे यांनी केले.


















