सोलापूर : 2019 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सोलापूर शहरांमध्ये प्रत्येक वृत्तपत्र, प्रत्येक चैनल आणि प्रत्येक प्रसारमाध्यमांमध्ये माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्याच जाहिरातीने लक्ष वेधून घेतले होते. त्या जाहिरातींमध्ये दुसरा एक चेहराही सर्वांचे लक्ष वेधत होता तो चेहरा म्हणजे मुस्लिम समाजातील काँग्रेसचे कार्यकर्ते मन्सूर गांधी यांचा.
काँग्रेस पक्षाच्या सोलापूर शहराध्यक्षपदी प्रकाश वाले यांची निवड झाली आणि त्यानंतरच मन्सूर गांधी हा चेहरा राजकीय पटलावर प्रकाशात आला. एकीकडे एमआयएम पक्ष सोलापुरात आल्याने मुस्लिम समाज काहीसा काँग्रेस पासून दूर गेला होता मात्र मन्सूर गांधी यांनी वेगवेगळ्या संकल्पनेतील जाहिरातींच्या माध्यमातून मुस्लिम समाजासह सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतले होते. मन्सूर गांधी यांनी काही सामाजिक कार्यक्रम ही राबवले परंतु त्यांना कोणतेही पद मिळाले नसल्याचे पाहायला मिळाले. मागील काही महिन्यांपासून मन्सूर गांधी हे काँग्रेस पासून दूर असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे त्यांची राजकीय भूमिका स्पष्ट होत नव्हती. ते ‘वेट अँड वॉच’ या भूमिकेत असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान सोलापूर मार्गे ‘वंदे भारत’ ही नवीन रेल्वे सुरू झाली आहे. या रेल्वेच्या स्वागताला मन्सूर गांधी हे आपल्या समर्थकांसह हजर होते मात्र त्यांच्या गळ्यात भाजपचा शेला दिसून आला. सोबत भाजप अल्पसंख्याक सेलचे पदाधिकारी होते. यावरून गांधी हे भाजपच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट होते. ते लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

















