सोलापूर : एकीकडे काँग्रेस पक्षातून आपणाला राजकीय भविष्य नसल्याचे ओळखत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या अतिशय जवळचे मानले जाणारे कोमारोव्ह सय्यद यांनी नुकतंच हात सोडून एमआयएमची पतंग हाती घेतली आहे. तर दुसरीकडे एमआयएमला आपले केलेले मुस्लिम समाजातील काही प्रमुख कार्यकर्ते पुन्हा काँग्रेस पक्षाच्या जवळ जात असलेले चित्र पहायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने माजी परिवहन सभापती सलीम पामा व दौला कुमठे यांचा समावेश दिसून येतोय.
सोलापूर शहर मध्य विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष वाहिद बिजापुरे यांनी आमदार प्रणिती ताईंच्या उपस्थितीत आपल्या शास्त्री नगर भागात काही कार्यक्रम घेतले आहेत. या कार्यक्रमात दौला कुमठे हे विशेष उपस्थित असल्याचे पहायला मिळाले. दौला सोबतच आता काँग्रेस पक्षातून नाराज होऊन एमआयएम मध्ये कार्यरत असणारे सलीम पामा हे सुद्धा या घोळक्यात दिसत आहेत.
वाहिद बिजापुरे यांनी नुकतंच पॅन कार्ड, ई श्रम कार्ड, बँक खाते शिबिरे घेतली त्यांच्या उद्घाटनला आमदार प्रणिती शिंदेंसोबत सलीम पामा आणि दौला कुमठे उपस्थित होते. ताईंच्या शेजारी थांबून फोटो काढण्याचा मोह या दोघांना आवरला नाही. यावरून हे दोन्ही नेते पुन्हा ताईंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात काम करण्यास तयार आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.
एकीकडे एमआयएम काँग्रेस फोडत असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षाने एमआयएमला सुरुंग लावण्यात सुरुवात केली असल्याचे चित्र यावरून दिसते. एमआयएम शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांनी याकडे दुर्लक्ष न करता हे गांभीर्याने घ्यावे अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून आहे.




















