सोलापूर : पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ऑपरेशन परिवर्तन या उपक्रमांतर्गत बंजारा समाजाच्या महिलांनी बनवलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीचा शुभारंभ ग्रामीण पोलिसांच्या मुख्यालयातील अलंकार हॉलमध्ये करण्यात आला.
या कार्यक्रमास संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, भटक्या विमुक्त जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके, आमदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, महापालिका आयुक्त पी शिवशंकर, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
(हे ही वाचा)सोलापूर महापालिका व जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीचे नव्याने आरक्षण या दिवशी काढणार सोडत
उपस्थित मान्यवरांनी एसपी सातपुते यांच्या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. परंतु हा उपक्रम सातत्याने सुरू राहावा यासाठी ही प्रयत्न व्हावा अशा अपेक्षा व्यक्त करण्यात आल्या. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी तर विधिमंडळात याबाबत पॉलिसी तयार व्हावी यासाठी काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि मी दोघं मिळून प्रयत्न करू असे आश्वासन दिले.
आमदार प्रणिती शिंदे यांनीही आपल्या भाषणात सचिन कल्याणशेट्टी यांच्या भूमिकेला अनुमोदन दिले. प्रणिती शिंदे यांनी एसपी सातपुते यांच्या बदलीनंतर दुसरा अधिकारी जेव्हा येईल त्यांनी सुद्धा या उपक्रमाची संवेदनशीलता जाणून घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली.



















