सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील 189 ग्रामपंचायतच्या निवडणुकीपैकी दक्षिण सोलापूर तालुक्यातील निम्बर्गी ग्रामपंचायतीचे सरपंचपद अतिशय प्रतिष्ठेचे बनल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याला कारण हे तसेच आहे सर्वपक्षीय मित्र म्हणून ज्यांची ओळख आहे ते काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष सुरेश हसापुरे यांचे चिरंजीव श्रीदीप हसापुरे हे निम्बर्गी गावच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात दक्षिण सोलापूर तालुक्याचे भारतीय जनता पार्टीचे आमदार सुभाष देशमुख गटाचे चन्नप्पा बोरगी हे उमेदवार असून हसापुरे-बिराजदार-पाटील गटाच्या बसवराज माळगे यांनी चन्नप्पा बोरगी यांच्या अर्जावर हरकत घेतली ती हरकत अशी होती की,
सरपंच पदाचे उमेदवार चन्नप्पा बोरगी 2013-14 पासून स्वतः जेसीबी लावून कॉन्ट्रॅक्टरचे काम करत होते. 9 हजार व 5 हजारचे चेक स्वतःच्या नावाने उचलले आहेत 2013-14 ते पुढील 10 वर्ष मी ग्रामपंचायत ठेकेदार काम करण्यास तयार म्हणून करारनामा करून दिला असे असताना नामनिर्देशन पत्रात मी ठेकेदार नाही म्हणून माहिती दिली, स्वघोषणा पत्र केले आणि शासनाची माहिती लपवली.
त्यामुळे उमेदवारासह निम्बर्गी गाव नेमून दिलेले यतीन शहा यांची पळापळ सुरू झाली. ही माहिती जेव्हा आमदार सुभाष देशमुख यांना देण्यात आली. तेव्हा आपला सरपंच पदाचा उमेदवार बाद होऊ नये याची काळजी बापूंनी घेतल्याची माहिती त्यांच्याच कार्यकर्त्याकडून मिळाली. बापूंनी संबंधित निवडणूक अधिकारी तसेच तालुक्याचे तहसीलदार अमोल कुंभार यांना वारंवार फोन करून या प्रकरणात अर्ज बाद करायचा नाही अशी तंबी दिल्याची माहिती समोर आली आहे.
हरकतीमध्ये दम असल्याने आणि आमदार सुभाष देशमुख यांनी हा विषय प्रेस्टीज केल्याने आता हा विषय थेट राज्याचे महसूलमंत्री असलेले जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांपर्यंत गेल्याची चर्चा ऐकण्यास मिळाली.
सकाळी 11 वाजता सुरू झालेली अर्ज छाननी प्रक्रिया दुपारी 2 वाजता सुनावणी होऊन रात्री सात वाजेपर्यंत निकाल देण्यात आला नव्हता. केवळ निम्बर्गी गावातील कार्यकर्ते, भाजपचे तालुक्यातील कार्यकर्ते त्याठिकाणी ठाण मांडून होते. निकाल आता येईल मग येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर रात्री सात नंतर माशाळे यांचे हरकत फेटाळून चन्नप्पा बोरगे यांचा अर्ज मंजूर करण्यात आला आहे शेवटी सुभाष देशमुख यांनी यात बाजी मारल्याचे दिसून आले आता या निकाला विरोधात हसापुरे बिराजदार गट काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



















