सोलापूर : जिल्हा परिषद कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी विवेक कुंभार यांची सांगलीला प्रमोशनवर बदली झाली आहे. त्यांनी शुक्रवारी आपला पदभार सोडला. कृषी विकास अधिकारी पदाचा पदभार द्यायचा कुणाला असा प्रश्न प्रशासनासमोर होता.
परंतु कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे हे सध्या विशेष घटक योजनेचे कामकाज पाहत असल्याने त्यांना प्रभारी पदभार देण्याचे निश्चित झाले. सामान्य प्रशासनाने तशी फाईल सुद्धा तयार केली होती. त्या फाईलवर केवळ पाचकुडवे यांची सही होणे बाकी होते. सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये काही घडामोडी घडल्या. या पदासाठी इच्छुक कृषी अधिकारी परमेश्वर वाघमोडे यांना ऐनवेळी प्रशासनाने पदभार दिला.
तसे पाहिले तर पाचकुडवे यांच्यापेक्षा वाघमोडे हे सीनियरच आहेत पाचकुडवे यांनी कोणतीही अपेक्षा प्रशासनाकडे केली नव्हती अशी माहिती मिळाली परंतु सध्या ते आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचे कामकाज चांगल्या पद्धतीने पाहत आहेत म्हणून त्यांना पदभार देण्याचे निश्चित झाले होते.
अधिक माहिती घेतली असता असे समजले की, सोमवारी एका वजनदार आमदाराचा फोन सामान्य प्रशासनाला आला आणि प्रशासनाने त्या आमदाराच्या सांगण्याप्रमाणे तातडीने फाईल बदलली आणि परमेश्वर वाघमोडे यांना कृषी विकास अधिकारी पदाचा पदभार दिला अशी माहिती सूत्रांकडून मिळाली.

















