सोलापूर : मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी मुख्याध्यापकांच्या कार्यशाळेत सायकल बँक या उपक्रमांतर्गत मदत करण्याचे आवाहन केले असता एका मुख्याध्यापकाने थेट दीड लाखाचा चेक मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी हे आपल्या शिक्षण विभागाच्या दशसूत्रीसाठी संपूर्ण जिल्हा पिंजून काढत आहेत. प्रत्येक तालुक्यात ते मुख्याध्यापकांची कार्यशाळा घेऊन दशसूत्री मागील उद्देश सांगण्याचा प्रयत्न करताना पहायला मिळते. याच कार्यक्रमात सीईओ स्वामी हे अकलूज याठिकाणी कार्यशाळा घेत होते. त्याठिकाणी त्यांनी उपस्थित सर्व मुख्याध्यापकांना मुलींच्या सायकल बँकला मदत करण्याचे आवाहन केले.
त्यांनी ‘सायकल भेट बहिणीसाठी’ हा उपक्रम जाहीर करताच त्या कार्यशाळेतील खडकमल शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर गायकवाड यांनी स्वामी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सायकल भेट या उपक्रमास तब्बल दीड लाखाचा चेक त्यांच्या हवाली केला. हा चेक मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी देशमुख यांच्याकडे सुपूर्द केला आहे


















