सोलापूर : लग्नासाठी मुलगी देण्याची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढल्याचा प्रकार सोलापुरात घडला आहे. महाराष्ट्र राज्य ज्योती क्रांती संघटनेकडून हा मोर्चा काढण्यात आला. विवाहासाठी इच्छुक असलेल्या अनेक तरुणांनी नवरदेवाच्या वेशामध्ये या मोर्चात सहभाग नोंदवला आहे. संघटनेचे अध्यक्ष रमेश बारसकर यांनी या अनोख्या मोर्चाचे नेतृत्व केले.
घोड्यांवर वरात समोर बँड बाजा वाजवत काही नवरदेव बिना नवरीचे सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले पाहायला मिळाले. हे लग्न नव्हतं तर हा मोर्चा होता. लग्नाला मुलगी मिळत नाही आता आम्ही काय करायचे? म्हणून वैतागलेल्या तरुणांनी नवरदेवाचा वेशभूषेत हा मोर्चा काढून लक्ष वेधले. महाराष्ट्र राज्यातील लग्न न झालेल्या तरुण मुलांना बायको मिळावी या एका प्रमुख मागणीसाठी हा आगळावेगळा मोर्चा सोलापुरात पाहायला मिळाला.
संघटनेचे नेते बारसकर यांनी या मोर्चा मागील आपली भूमिका स्पष्ट करताना, युवकांना लग्नाला मुलगी मिळत नसेल तर काय करावे, आई वडील वैतागले, अशांकडे सरकारने लक्ष देऊन त्यांची मागणी सोडवावी अशी भूमिका त्यांनी मांडली.





















