सोलापूर : शहर राष्ट्रवादी काँग्रेस मधील अंतर्गत आणि गटबाजीच्या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी मुंबईत नेत्यांसोबत बैठक घेतली.
या बैठकीला पक्ष कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, सोलापूर जिल्हा प्रभारी माजी मंत्री दत्तात्रय भरणे, शहर जिल्हाध्यक्ष भारत जाधव, सोलापूर शहर निरीक्षक शेखर माने, प्रदेश सचिव संतोष पवार, महेश कोठे, माजी शहराध्यक्ष महेश गादेकर, नगरसेवक तौफिक शेख, दिलीप कोल्हे, प्रदेश सचिव शंकर पाटील, युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर, युवक शहराध्यक्ष जुबेर बागवान, इरफान शेख, महिला शहराध्यक्ष सुनिता रोटे, विद्या लोलगे, विद्यार्थी संघटनेचे सुहास कदम तसेच नूतन प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड हे उपस्थित होते.
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पक्ष संघटना बळकट करण्या संदर्भातील ध्येयधोरणांवर चर्चा करण्यात आली. शहरात भेडसावणाऱ्या समस्या व त्यांचे निराकरण करण्यासाठी पक्षाने काय उपाययोजना केल्या पाहिजेत याबाबत पक्षश्रेष्ठींनी पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी उपस्थित सर्वच नेत्यांनी महेश कोठे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधी येणार हाच प्रश्न उपस्थित केला. यावेळी जयंत पाटील यांनी कोठे हे तर आपलेच असल्याचे सांगत नेत्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. सोलापूर शहरात असलेली गटबाजी, अंतर्गत राजकारणावर अजित पवार यांनी चांगलेच सुनावल्याची माहिती आहे.
महेश कोठे यांना राहिलेले प्रवेश लवकरात लवकर करून घ्या, जी काय ताकद लागेल ते आम्ही देण्यास तयार आहोत प्रवेशाच्या तारखा निश्चित करा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या.
सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये समन्वय ठेवण्यासाठी निरीक्षक शेखर माने, महेश कोठे, शहराध्यक्ष भारत जाधव, महेश गादेकर, तौफिक शेख, युएन बेरीया, संतोष पवार या सात जणांची समन्वय समिती नेमण्यात आली आहे.
माजी महापौर मनोहर सपाटे यांच्या प्रकरणाचे सुद्धा सविस्तर माहिती जयंत पाटील आणि अजित पवार यांनी घेतली मात्र त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नसल्याचे समजले




















