सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या गटाच्या सोलापूर शहर युवक अध्यक्षपदी शरद पवार यांच्या ताफ्यावर जेसीबी मधून पुष्पवृष्टी करणाऱ्या अक्षय वाकसे यांची निवड करण्यात आल्याचे शहराध्यक्ष भारत जाधव यांनी जाहीर केले तर शहर कार्याध्यक्षपदी सरफराज शेख यांची निवड झाली आहे या नावाची अधिकृत पत्रे सोमवारी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यामार्फत येणार आहेत. सर्वाधिक इच्छुक असणारे नजीब शेख यांना मात्र संधी मिळू शकली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक अध्यक्ष पदासाठी प्रचंड सुरस निर्माण झाली होती अजित पवार यांच्या गटाचे युवक अध्यक्ष जुबेर बागवान आहेत. त्यांच्याच तोडीला तोड म्हणून शरद पवार गटाच्या युवक अध्यक्ष पदासाठी मुस्लिम समाजातीलच दोन चेहरे सर्वाधिक इच्छुक होते. त्यामध्ये हॉटेल व्यवसायिक नजीब शेख आणि सरफराज शेख यांचा समावेश होता. तसेच महेश कोठे समर्थक अक्षय वाकसे यांनीही आपला प्रयत्न सुरू ठेवला होता.
दोन मुस्लिम समाजातील युवकांमध्ये कोण बाजी मारणार याकडेही सोलापूर शहराचे लक्ष लागले होते. नजीब शेख यांच्यासाठी मुस्लिम समाजातील जेष्ठ मान्यवरांचे शिष्टमंडळ शरद पवार यांना भेटले होते.
परंतु पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष हे मुस्लिम समाजाचे, अजित पवार यांच्या गटाचा युवक अध्यक्ष हाही मुस्लिम समाजाचा, आता परत मुस्लिम समाजाला हे पद गेले तर पक्षामध्ये चुकीचा मेसेज जाईल असे काही सोलापुरातील पक्षातील निष्ठावंतांनी वरिष्ठांच्या कानावर घातले होते. त्यातच महेश कोठे यांनी अक्षय वाकसे यांच्या नावाची शिफारस केली होती. यात शेवटी महेश कोठे यांनीच बाजी मारली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयातून अजित पवारांचा फोटो काढणारा सर्फराज शेख या युवकाला पक्षाने बक्षीस म्हणून शहर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्या उपस्थितीमध्ये नूतन निवडी झालेल्या युवक अध्यक्ष व कार्याध्यक्ष यांच्यासह कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.