सोलापूर : मागील सहा महिन्यापासून जिल्हा परिषद मध्यामिक शिक्षण अधिकारी पदाच्या संगीत खुर्चीचा खेळ चालू आहे. पूर्णवेळ भास्कर बाबर गेल्यापासून खुर्चीला अधिकारी मिळेना असे चित्र पाहायला मिळत आहे. शिक्षणाधिकारी पदाचा पदभार यापूर्वी उपशिक्षणाधिकारी सुलभा वटारे, त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख, त्यानंतर उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे, त्यानंतर पूर्णवेळ म्हणून मारुती फडके हे आले, पण त्यांनी कामाचा व्याप आणि कर्मचाऱ्यांची कमतरता पाहता रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.
परत हा पदभार उपशिक्षणाधिकारी महारुद्र नाळे यांच्याकडे देण्यात आला. लगेच पंधरा दिवसांनी पुन्हा मारुती फडके हजर झाले. याच दरम्यान 20 टक्के टप्पा अनुदान आलेल्या शिक्षकांच्या शालार्थ आयडीचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यामध्ये शेवटी रजिस्टर गहाळ प्रकरणात पाच तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर परत मारुती फडके हे रजेवर गेले, त्यानंतर चार्ज द्यायचा कुणाकडे असा विश्वास होता परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी शेवटी उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे पदभार सोपविला आहे. अंधारे यांच्याकडे पदभार आल्यानंतर अनेक शिक्षक संघटनांनी येऊन त्यांचे अभिनंदन केले. मागील चार महिन्यांपासून विस्कळीत झालेला माध्यमिक शिक्षण विभाग सुरळीत करण्याचे अपेक्षा संघटनानी व्यक्त केली.