सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रध्वज चढविणे आणि उतरविण्याचे काम प्रामाणिकपणे करणाऱ्या सैपन जमादार यांना रोजंदारी तत्त्वावर कामावर घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष राजू बेळेनवरू यांनी स्वातंत्र्यदिना आंदोलन करून लक्ष वेधले.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये गैबीसाब जमादार हे राष्ट्रध्वज चढविणे उतरवण्याचे काम करत होते. 1988 सालामध्ये जमादार यांनी स्वेच्छा सेवानिवृत्ती घेतली. नंतर त्यांचे चिरंजीव मेहबूब जमादार जिल्हा परिषदेचे वाहन मदतनीस यांनी 1988 ते 2019 पर्यंत नियमित सेवानिवृत्त होईपर्यंत जवळपास 30 वर्ष राष्ट्रध्वज चढविणे व उतरवण्याचे काम केले आहे. मेहबूब जमादार हे 31 मे 2019 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले.
त्यादरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील मजूर रामा शंकर जगदाळे यांची राष्ट्रध्वज चढविणे व उतरवण्याकरिता नेमणूक करण्यात आली मात्र जगदाळे यांना रस्त्यावरची कामे व रस्त्याच्या कडेने झाडे जोडपे काढणे या व्यतिरिक्त कोणतेही काम येत नाही. राष्ट्रध्वजाचे काम अत्यंत जोखमीचे व जबाबदारीचे आहे असे कळवल्याने जगदाळे यांना काम देण्यात आले नाही.
सेवानिवृत्तीनंतरही मेहबूब जमादार हे काम करत होते नंतर त्यांचे चिरंजीव सैपन जमादार यांनी राष्ट्रध्वज चढवणे व उतरवण्याचे काम वडिलांकडून शिकले. त्यांच्या आजारपणाच्या काळात सैपन हाच हे काम करत होता. आता वयोमानानुसार मेहबूब जमादार यांना व त्यांची तब्येत बरी नसल्याने त्यांचा मुलगा सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रध्वज चढवणे व उतरवण्याचे काम करतो. त्यामुळे आता सैपन जमादार यांना रोजंदारी तत्त्वावर जिल्हा परिषदेने नियुक्ती द्यावी अशी मागणी बेळेनवरू यांनी केली आहे.