कोरोनाची पहिली लाट ओसरत असताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा नोव्हेंबर 2020 मध्ये दिलीप स्वामी यांनी पदभार घेतला. पदभार घेतल्यापासून कोरोना प्रतिबंधासाठी सीईओ स्वामी यांनी अनेक उपक्रम राबविले. दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून “माझे गाव कोरोना मुक्त गाव” व “माझे दुकान माझी जबाबदारी” हे दोन अभियान सुरू केले.
नुकतेच राज्य शासनाने सीईओ स्वामी यांनी राबविलेले “गाव तिथे कोविड सेंटर” हे अभियान राज्यभर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानिमित्ताने सोलापूर पॅटर्न म्हणून या अभियानाचा गौरव झाला.
मान्सूनचे आगमन झाले की शासन स्तरावर व सामाजिक स्तरावर वृक्षारोपणाची लगबग सुरू होते. राज्यात दरवर्षी या कालावधीत लाखो वृक्षांचे रोपण केले जाते. परंतु मोठ्या प्रमाणात वृक्ष लावल्यानंतर सर्वच रोपे जिवंत राहतात असे नाही. रोपटे लावल्यानंतर त्याच्या संवर्धनाकडे वैयक्तिक लक्ष देवून संगोपन करणे आवश्यक आहे. यासाठी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्याऐवजी प्रत्येकाने एकच वृक्ष लावून त्याचे जतन करावे ही संकल्पना पुढे आली व त्यातूनच सीईओ स्वामी यांनी “एक पद एक वृक्ष” हे अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 24 जून पासून 30 जून पर्यंत हे अभियान सोलापूर जिल्ह्यात राबविले जाणार आहे. जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती मध्ये पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी यांची संख्या 14000 होते. ग्रामपंचायतींमध्ये सरपंच अधिकारी व कर्मचारी संख्या 2000 असून मानधनावरील कर्मचारी संख्या 2000 असे एकूण 18000 एवढी संख्या होते. उर्वरित 2000 संस्था-पतसंस्था यांचेकडून लावण्यात येतील. एकंदरीत 20000 वृक्ष लागवड करून ते पुर्णपणे जगवले जातील. असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.
या उपक्रमात पदाधिकारी अधिकारी यांनी त्यांचे त्यांचे मुख्यालयात जि प क्षेत्रात जमेल तेथे योग्य ठिकाणी रोपटे लावायचे आहे. प्रत्येक मुख्याध्यापक शिक्षक यांनी त्यांच्या शाळेच्या आवारात योग्य ठिकाणी वृक्षारोपण करावयाचे व नावाने ते जतन करायचे. आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या ठिकाणी वृक्षारोपण करावयाचे आहे. अंगणवाडी पर्यवेक्षिका अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी अंगणवाडी परिसरात वृक्षारोपण करायचे आहे तर इतरांनी जागा उपलब्धतेप्रमाणे वृक्षारोपण करून ते जतन करायचे आहे. वृक्ष लागवडी नंतर प्रत्येक ठिकाणच्या वृक्षास अनुक्रमांक देऊन त्यांचे रक्षण व जतन करण्यासाठी अभिलेखे तयार करायचे आहेत. सामाजिक वनीकरण विभाग, वन विभाग व कृषी विभाग रोपे उपलब्ध करून देण्यासाठी मदत करणार असून वृक्षांच्या देखभालीसाठी या विभागांचे मार्गदर्शन लाभणार आहे. कोणी स्वयंस्फूर्तीने एकापेक्षा जास्त वृक्ष लावणार असतील तर त्याचे स्वागतच आहे परंतु वृक्षाची काळजी व संगोपन त्यांनी स्वतः करायचे आहे. 20 जून पर्यंत जिल्हाभर वृक्षलागवडीचा आराखडा पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हा मुख्यालय कृषी विकास अधिकारी व तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी हे नियोजनास मदत करतील. गटविकास अधिकारी यांनी समन्वय समितीची बैठक घेऊन सूक्ष्म नियोजन करावे असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेले आहेत.