सोलापूर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पुढे आलेल्या ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत सोलापुरातून मातीचे अमृत कलश बुधवारी मुंबई मार्गे दिल्लीकडे रवाना झाले. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हिरवा झेंडा दाखवील्यानंतर अमृत कलश घेऊन बस पुढे निघाली.
या ठिकाणी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, महापालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, पंढरपूरचे तहसीलदार सुशील बेल्हेकर, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, नेहरू युवा केंद्राचे युवा अधिकारी अजीत कुमार, महापालिकेचे गणेश बिराजदार यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक उपस्थित होते.
या अभियानाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली. देशासाठी बलिदान दिलेले शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी या अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर पालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यामाने जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आलेले होते. या अमृत कलश मध्ये सोलापूर महानगरपालिकेचे एक कलश, सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समितीचे 11 कलश, जिल्हा नगर पालिका प्रशासनाच्या वतीने एक कलश घेऊन जात आहेत.
आज हे सर्व कलश नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक 27 ऑक्टोबर 2023 रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्य यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबईकडे घेऊन जात आहेत. त्यानंतर अंतिम सोहळा 1 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे.