सोलापूर : लोकशासन आंदोलन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजू दिंडोरे व जिल्हा कार्याध्यक्ष मारुती जाधव यांनी निवासी उपजिल्हाधिकारी क्षमा पवार यांना निवेदन देऊन सोलापूर उपविभागीय अधिकारी क्र. १ सदाशिव पडदुणे यांची विभागीय चौकशी सुरु असताना त्यांना चार्ज दिला कसा? असा प्रश्न उपस्थित केला आहे.
हे प्रकरण पडदुने हे मोहोळ तहसीलदार असताना अभयारण्य आरक्षित जमिनीतून मुरूम उपसा केल्याच्या प्रकरणातील आहे. या मुरूम उपसा प्रकरणात तत्कालीन तहसीलदार पडदूणे यांच्या विरोधात बाळकृष्ण बटेश्वर खराडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मुंबई उच्च न्यायालय मुंबई यांच्या दिनांक ५ सप्टेंबर २०१९ च्या PLI/ ८६/२०१४ मधील आदेशानुसार आजपर्यंत कोणतीही कारवाई सबंधीत प्रशासन अधिकारी अथवा वरिष्ठांनी केलेली नाही. त्यामुळे माझी आपणास नम्र विनंती की, माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचे अवमान करणाऱ्या अधिकाऱ्या विरुध्द तात्काळ गुन्हे नोंदवावे आणि त्यांची सेवा समाप्ती करण्यात यावी, तसेच याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास ‘आम्ही आमच्या संघटनेच्या व पक्षाच्या वतीने दिनांक ०२ ऑक्टोबर २०२३ रोजी गांधी जयंती पासून तीव्र स्वरुपाचे आंदोलन करणार आहोत याची गंभीरतेने दखल आपण घ्यावी.