सोलापूर, दि. 28 ( जिमाका):- गणेशोत्सव व ईद-ए-मिलाद च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्ह्यात सामाजिक सलोखा व ऐक्याची भावना चांगली राहावी व सण-उत्सव जिल्ह्यात अत्यंत उत्साहाने साजरे करावेत यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने तालुका व जिल्हास्तरावर शांतता समितीच्या बैठका घेऊन सर्व समाजातील पदाधिकारी, प्रतिनिधी, मौलवी, सामाजिक कार्यकर्ते यांना आवाहन करण्यात आले.
त्याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी जिल्ह्यातील गणेश मंडळांना भेटी देऊन तेथे श्री गणेशाची आरती केली तसेच गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व ध्वनी प्रदूषण होणार नाही याची दक्षता घेऊन काढावी, असे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाने ईद-ए-मिलाद ची दिनांक 28 सप्टेंबर रोजीची सुट्टी ही 29 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलाद सण साजरा करणार असल्याने 29 सप्टेंबर रोजी सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर गणेश उत्सव विसर्जन मिरवणूकसाठी जिल्हा प्रशासनाने स्थानिक स्तरावर दिनांक 28 सप्टेंबर रोजीची सुट्टी जाहीर करून हा सण नागरिकांना उत्साहाने व शांततेने साजरा करता येईल यासाठी प्रयत्न केले आहेत.
त्याप्रमाणेच बोरामणी व मंद्रूप येथील प्राचीन मस्जिद येथे भेट दिली. तसेच येथील मौलवी व मुस्लिम धर्मातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली. सामाजिक सलोखा राखण्याबाबत सर्वांना आवाहन केले. ईद-ए-मिलाद च्या अनुषंगाने सोलापूर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मिरवणूक काढण्यात येत असते, त्या पार्श्वभूमीवर ज्या ठिकाणी मिरवणुका काढण्यात येणार आहेत त्या ठिकाणी दिनांक 29 सप्टेंबर 2023 रोजी दारूबंदीचे आदेश देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. गणेश उत्सव मिरवणूक व ईद-ए-मिलाद सण एकाच दिवशी आल्याने मुस्लिम समाजाने त्यांचा सण विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबर रोजी साजरा करण्याची ठरविल्याबद्दल त्यांनी मुस्लिम समाजातील नागरिकांचे अभिनंदन केले.
परस्परांच्या सण-उत्सवाचा आदर ठेवून समन्वयाची भूमिका दोन्ही समाजाकडून घेऊन मुस्लिम समाजाने आपला सण दुसऱ्या दिवशी साजरा करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. अशा प्रकारच्या समन्वयातून सोलापूर जिल्ह्याची शांतताप्रिय जिल्हा ही संपूर्ण राज्यात असलेली ओळख महत्त्वाची ठरते. ही फक्त ओळख नसून शांतताप्रिय सोलापूर जिल्हा ही संस्कृती असल्याचे त्यांनी म्हटले. ही शांततेची संस्कृती टिकून ठेवण्यासाठी सर्व धर्मीयांनी यापुढील काळातही परस्परात समन्वय ठेवावा, परस्परांच्या रूढी परंपरांचा आदर करावा, परस्परात बंधुभाव वाढवून एकमेकांच्या उत्साहात एकत्रित येऊन आनंद साजरा करावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आज मंद्रूप येथील जय सेवालाल तरुण गणेश मंडळ, बोरामणी येथील जय भवानी तरुण मंडळ, कुंभारी येथील जय मार्कंडेय एकता गणेश मंडळ, सोलापूर शहरातील पुण्यनगरी वृत्तपत्र येथील गणपती या सर्व मंडळांना भेटी घेऊन येथे गणपतीची आरती ही केली. तसेच बोरामणी येथील दत्त मंदिर येथे भेट दिली व येथील नागरिकांशी चर्चा केली. त्याप्रमाणेच मंद्रूप येथील जामा मस्जिद व बोरामणी येथील जामा मस्जिद यांनाही भेट देऊन सर्व नागरिकांशी चर्चा करून त्यांना सण उत्सव आनंदाने साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक व ईद-ए-मिलादच्या सर्वांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंद्रूप येथील जय सेवालाल तरुण गणेश मंडळाच्या परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.