सोलापूर : काही दिवसात दहावी बारावीचा निकाल लागणार त्यानंतर पालकांची आपल्या मुलांचे दाखले काढण्यासाठी सेतू परिसरात मोठी गर्दी होणार परंतु सोलापुरातील मक्ता संपल्याने सेतू कार्यालय प्रशासनाने बंद केलेले.. दुसरीकडे उत्तर तहसील कार्यालयामध्ये मानधन वाढल्याने निराधार लाभार्थ्यांना 21000 रुपयाचा दाखला देणे बंधनकारक करण्यात आल्याने तिथेही गर्दी उसळलेली. अशातच शहरातील महा-ई-सेवा केंद्रातून दाखले वेळेवर मिळत नाहीत, सर्वसामान्य नागरिकांची लूट होत आहे अशा तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आणि सेतू कार्यालय लवकरात लवकर सुरू करावे ही मागणी वाढली.
अशी एकूणच परिस्थिती पाहता राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी तातडीने निवासी जिल्हाधिकारी शमा पवार, उपविभागीय अधिकारी क्रमांक एक विठ्ठल उदमले, उत्तर सोलापूरचे तहसीलदार सैफन नदाफ यांची बैठक घेऊन तातडीने नियोजन केले. नागरिकांना एका तासात दाखला त्यांच्या हातात मिळावा या दृष्टीने दहा दिवस सोलापूर शहरात महाशिबिर भरवण्याचे ठरले. आता या शिबिराला नेमकी जागा कुठली घ्यायची या विचारात प्रशासन होते त्याचवेळी मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नार्थकोट प्रशालेची निवड करण्यात आली रात्री नऊ वाजता अप्पर जिल्हाधिकारी ठोंबरे यांनी जागेची पाहणी केली आणि जागा निश्चित केली.
एका दिवसात दाख़ला निर्गमित करण्यासाठी बारा काउंटर लावण्यात आले. सदर बारा काउंटरवर महा-ई-सेवा केंद्रांचे ऑपरेटर्सची नियुक्ती करण्यात आली. त्याचबरोबर उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील चार नायब तहसीलदार, चार अव्वलकारकून, पाच सर्कल ऑफ़िसर, पाच लिपिक, सहा तलाठी, दहा कोतवाल व चार ऑपरेटर अशी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून आठवडाभर मध्यवर्ती ठिकाणी हा सर्व सेटअप कार्यरत ठेवण्यात आला.
पहिल्याच दिवशी नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. महसूल विभागाचे वतीने एकूण 640 उत्पन्नाचे दाखले, 75 जातीचे दाखले 48 नॉन क्रिमीलेअर दाखले, 33 आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक दाखले, 168 रहिवासी दाखले वितरण करण्यात आले. पहिल्या दिवसी एकूण 972 दाखल्यांचे वितरण करण्यात आले.
या महशिबिराचे यश म्हणजे संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या बाळे येथील तब्बल 100 वर्षाच्या धुरपाबाई गेनबा कांबळे या आजीला 21 हजाराचा उत्पन्नाचा दाखला ताटकळत न उभे राहता मिळाला. त्यामूळे लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद तर दिसलाच मात्र प्रशासन सुद्धा समाधानी दिसले.


















