सोलापूर, दि. 1(जिमाका):- प्रधानमंत्री घरकुल आवास योजने अंतर्गत रेनगर येथील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांचे काम माहे नोव्हेंबर 2023 अखेर पर्यंत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित रेनगर येथील घरकुल कामांचा साप्ताहिक आढावा प्रसंगी जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता श्री. पाटील यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी व रे नगर हाऊसिंग सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत रे नगर येथे पात्र लाभार्थ्यांसाठी 30 हजार घरकुले बांधण्याचा उपक्रम केंद्र व राज्य शासनाच्या वतीने मंजूर करण्यात आलेला आहे. यातील पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरकुलांपैकी 14 हजार 300 घरकुलांचे काम पूर्ण झालेले आहे. तरी उर्वरित सातशे घरकुलांचे काम प्रगतीपथावर असून सर्व संबंधित यंत्रणांनी हे काम माहे नोव्हेंबर 2023 अखेर पर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या.
रे नगर येथील पहिल्या टप्प्यांच्या 15 हजार घरकुलांचे वितरण लाभार्थ्यांना प्रधानमंत्री यांच्या हस्ते करण्याचे नियोजित असून त्या अनुषंगाने सर्व संबंधित यंत्रणांनी त्यांच्याकडील प्रगतीपथावर असलेली सर्व कामे त्वरित पूर्ण करावीत. या भागातील मराठी व उर्दू शाळेचे प्रस्ताव शासनाने त्वरित मंजूर करावेत, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सातत्याने पाठपुरावा करावा. तसेच रे नगर येथील 40 अंगणवाड्यांना मान्यता दिलेली असून त्यातील 26 अंगणवाड्यांचे स्लॅब ची कामे पूर्ण झालेली असून उर्वरित अंगणवाडीची कामेही पूर्ण करून घ्यावेत. सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प व पाणी प्रक्रिया प्रकल्प अधिकारी वेगाने पूर्ण करून घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांनी रे नगर येथील पहिल्या टप्प्यातील 14300 घरकुलांचे काम पूर्ण झालेले असून यापैकी 12000 घरकुलांचे 216 कोटींचे कर्ज वितरण बँकांनी केले आहे असे सांगितले. यावेळी रेनगर हाऊसिंग सोसायटीचे प्रतिनिधी यांनी वैयक्तिक वीज जोडणीची रक्कम अधिक असल्याची तसेच अन्य पायाभूत सुविधाच्या अनुषंगाने लवकर कामे पूर्ण करण्याची मागणी केली.