सोलापुरात काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट ; गृहमंत्री अमित शहा यांचा पुतळ्याला…..
सोलापूर : संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ सोलापुरात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवन समोर हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा घेत अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
संसदेत गृहमंत्री शहा यांनी डॉक्टर आंबेडकर यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्याचे पडसाद सोलापुरात उमटले. काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि मागासवर्गीय सेलच्या वतीने सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी काँग्रेस भवनाला पोलिसांचा मोठा गराडा होता. कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करतानाच काँग्रेस भवनातून गृहमंत्री अमित शहा यांचा प्रतिकात्मक पुतळा आणला. त्या पुतळ्याला कार्यकर्ते यांनी जोडे मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा बंदोबस्तला असलेल्या पोलिसांनी तातडीने तो पुतळा हिसकावून घेतला. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये प्रचंड झटापट झाली.
दरम्यान शहराध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले, केंद्रातील भारतीय जनता पार्टीचे सरकार जाणीवपूर्वक महापुरुषांचा अवमान करण्याचा प्रयत्न करत आहे. छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल बदनामी कारक वक्तव्य करून देशात वेगळे वळण लावण्याचा प्रयत्न होत आहे परंतु काँग्रेस पक्ष हेच कदापि सहन करणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्य प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नरोटे यांनी केली.