सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधला. मी पदभार घेऊन केवळ वीस दिवस झाले आहेत. नव्याने कोणतेही काम घेण्यापेक्षा आहे तेच काम प्रचंड आहे यातच सुधारणा अपेक्षित आहेत. येत्या सहा महिन्यात सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये निश्चित बदल दिसेल असे सांगतानाच माझ्या स्वभावात कोणताही बदल होणार नाही, माझी शिस्त कायमच राहणार असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा हद्दवाढ भागामध्ये गेल्या आहेत त्या ठिकाणच्या अनेक शाळांना आव्हाळे यांनी यापूर्वी भेट दिली. किमान 20 विद्यार्थ्यांच्या पटसंख्या असलेल्या शाळेतील विद्यार्थी त्या शाळेच्या एक किलोमीटर अंतरावर ज्या महानगरपालिकेच्या शाळा आहेत त्या ठिकाणी वर्ग करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. केवळ विद्यार्थी वर्ग होतील शिक्षक किंवा शाळेची जागा नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिपाई हनुमंत काळे आत्महत्या प्रकरणांमध्ये सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्या प्रकरणात जर संबधित संस्था किंवा शिक्षण विभाग दोषी असेल तर त्या तात्कालीन शिक्षणाधिकार्यावर कारवाई प्रस्तावित करेन असा इशारा आव्हाळे यांनी दिला.
जल जीवन मिशन योजनेअंतर्गत कायम आढावा घेतला जातो चांगल्या दर्जाचे काम व्हावे याकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष आहे. तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांची विभागीय चौकशी सुरू झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष बळीराम सर्वगोड यांनी पत्रकार कक्षामध्ये सीसीटीव्ही बसवण्याची मागणी केली. त्यावर तातडीने सीईओ मनीषा आव्हाळे यांनी संबंधित विभागाला सूचना केल्या आणि तात्काळ पत्रकार कक्षाची स्वच्छता करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे आदेश दिले. त्यामुळे आता पत्रकार कक्षात बाहेरून येऊन मावा- तंबाखू खाणाऱ्यांवर जरब बसणार आहे.