सोलापूर : महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन तीव्र होताना दिसत आहे. सोमवारी दिवसभरात कोणताही ठोस निर्णय न झाल्याने राज्यात त्याचे पडसाद उमटले. एका आमदारांचे घर जाळण्यात आले, राजकीय पक्षांचे कार्यालय फोडले, एसटीवर दगडफेक झाली, एसटी बस पेटवण्यात आली, महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्यात आली.
एकीकडे असे चित्र असताना दुसरीकडे सोलापुरात मराठा समाजाच्या नेत्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयाला कुलूप लावून वरिष्ठ अधिकाऱ्यांना आत जाण्यापासून रोखले आहे.
यामध्ये सत्ताधारी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, दिलीप कोल्हे भाजपचे अनंत जाधव दास शेळके शिवसेना ठाकरे गटाचे प्रताप चव्हाण, काँग्रेस पक्षाचे सुनील रसाळे, महेश धाराशिवकर, श्रीकांत घाडगे यांच्यासह मराठा समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यात आले.