सोलापूर : तब्बल तीन वर्षाच्या खंडानंतर सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण शुक्रवारी उस्फूर्त अशा वातावरणात पार पडले.
राज्याचे महसूल मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अर्धा तास अगोदरच एक घटना घडली.
धनगर समाजाच्या आरक्षणाकडे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजातील दोन बांधवांनी पालकमंत्र्याच्या अंगावर भंडारा उधळला. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. अशातही पालकमंत्र्यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावून जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा उत्साह वाढवला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते अतिशय मोठा बुके देऊन पालकमंत्र्याचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रम तब्बल सव्वा तास चालला. या कार्यक्रमानंतर जेव्हा पालकमंत्री सभागृहातून बाहेर पडले ते गाडीत बसताच मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी बचत गटाच्या माध्यमातून तयार केलेल्या वस्तूंची एक भेटवस्तू पालकमंत्र्यांना दिली.
ही भेटवस्तू हातात घेताच पाहून पालकमंत्री आनंदले. या भेटवस्तूला बघितल्यानंतर पालकमंत्री स्वतः जिल्हा परिषदेला या भेटवस्तूचे ब्रॅण्डिंग करा अशा सूचना केल्या.