सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आयएएस दिलीप स्वामी यांना देशात होणाऱ्या आगामी पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय ऑब्झर्वर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. त्याच्या बैठकीसाठी ते दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पोस्टिंगच्या प्रतीक्षेत असलेल्या दिलीप स्वामी यांना भारत निवडणूक आयोगाने आगामी होणाऱ्या तेलंगणा, मिझोरम, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. या पाच राज्याच्या निवडणुकीसाठी केवळ वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांचीच ऑब्झर्वर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
त्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाचे सचिव सत्यजित घोष यांच्या आदेशानुसार शुक्रवार सहा ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये प्रशिक्षण बैठक बोलावली आहे. त्यासाठी दिलीप स्वामी हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे आणि दिलीप स्वामी यांची निवड झाली आहे. या पाच राज्याच्या निवडणुकीसाठी केंद्रीय निरीक्षक म्हणून निवड झाल्याने आता ते तीन ते चार महिने निवडणुकीच्या ड्युटीवर राहतील.