सोलापूर : समाजात जीवन जगत असताना उत्तरदायित्वाची भावना ही चांगली गोष्ट आहे. आपल्याला केवळ प्रासंगिक कार्यक्रम करून चालणार नाही, आपल्याकडे ३६५ दिवसांचा कृती कार्यक्रम असणे आवश्यक आहे. जीवनामध्ये आपल्याला तर्कसंगत आणि विज्ञाननिष्ठा व्हायला हवं, आपण कधीही भावनेच्या आहारी जाता कामा नये, तुम्ही तर्काच्या आणि विज्ञानाच्या कसोटीवरती गोष्टी पडताळून पाहत राहिलात, तर तुमच्या हातून निश्चितच समाजासाठी पायाभूत कार्य घडेल, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले.
सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी स्थापित केलेल्या ‘शाक्य’ बहुउद्देशीय समाजसेवी संस्था, सोलापूर या संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनाचा कार्यक्रम, शुक्रवारी दुपारी पार पडला. यावेळी सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक अशोक भालेराव, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक विजय परकाळे, सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे,
सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक महिबूब मुजावर, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालयातील डॉ. औदुंबर मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक आबासाहेब दैठणकर होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुध्द, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आले. प्रतिमापूजनानंतर कवि शिवाजी नाईक नवरे यांनी संगीताचा साज चढवत संविधानाच्या उद्देशिकेचे गायन केले. त्यांच्या या अनोख्या प्रयत्नाला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘शाक्य ‘ संस्थेच्या पदाधिकारी-सभासदांनी त्यांच्या ड्रेसकोड मध्ये उपस्थितांच्या साक्षीत बहुजन महामानवांना मानवंदना दिली. त्यानंतर शाक्य संस्थेचे अध्यक्ष अंगद मुके यांनी प्रास्ताविकात संस्थेच्या वर्षभराच्या वाटचालीवर प्रकाश टाकला.डॉ. औदुंबर मस्के यांनी ही मौलिक मार्गदर्शन केले.
अपर जिल्हाधिकारी ठोंबरे यावेळी म्हणाले, आज संघटना व त्यांच्या कामाचा एकंदर अवलोकन किंवा स्वरूप पाहता, ते क्रियेवर प्रतिक्रिया देण्यात व्यस्त आहेत, असं स्पष्ट करून आपण प्रतिक्रियेमध्ये अडकून न राहता स्वतःहून क्रिया करायला शिकलं पाहिजे. ज्या दिवशी क्रिया करण्याचा कार्यक्रम आपण सुरू करू, त्या दिवशी इतर कोणीही केलेल्या क्रियेला प्रतिक्रिया देण्याची वेळ आपल्यावर येणार नाही, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.
मी लहानपणापासून सामाजिक चळवळीत होतो सर्वधर्म समभाव विचारांने कार्य करीत आले. परिवर्तनवादी चळवळीत कार्य करीत असताना प्रसिद्धी माध्यमातून दूर राहणे पसंत केले. चार वर्षाच्या पोलीस सेवेत फार काही शिकलो असे नाही, तरीही शाक्य संघाचे सदस्य हेच माझे मार्गदर्शक आहेत, मी सामाजिक भान राखत माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेल, तोपर्यंत शाक्य संघासोबत राहीन, अशी ग्वाही कार्यक्रमाचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस उपअधिक्षक आबासाहेब दैठणकर यांनी यावेळी बोलताना दिली.
शाक्य संस्थेच्या वर्षपूर्ती सोहळ्यास सर्व पदाधिकारी – सभासद सपत्नीक उपस्थित होते. शाक्य संस्थेच्या महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा सुनिता केरू जाधव यांनी ही उपस्थितांसमोर शब्दरूपी अनुभव कथन केले. बबिता बाबरे, संजीवनी कांबळे, सुनिता दिलपाक, गीता बनसोडे, अरुणा कोरे, शोभा सावंत, सविता ओव्हाळ, लता वाघमारे, मंगल सुरवसे, अनिता कांबळे, ललिता कांबळे, मायादेवी गायकवाड, सुरेखा काळोखे, संध्या कांबळे उपस्थित होते. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन प्राध्यापिका अंजना गायकवाड यांनी केले. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.