सोलापूर : काँग्रेस पक्षाचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी आपले समर्थक भटक्या विमुक्त जाती जमाती विभागाचे शहराध्यक्ष भारत जाधव यांच्यासोबत शनिवारी भारतीय जनता पार्टीचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांची भेट घेतली.
आमदार सचिन कल्याणशेट्टी हे जिल्हा परिषदेमध्ये एका कार्यक्रमासाठी आले असता सकाळी बाराच्या सुमारास प्रकाश वाले हे जिल्हा परिषदेमध्ये आले. आमदार कल्याणशेट्टी हे कार्यक्रम संपून बाहेर आले असता सभागृहाच्या पोर्चमध्ये त्यांनी वाले यांना पाहताच मामा म्हणून उल्लेख केला.
तेव्हा दोघेही खाली आले आणि जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांच्या अँटीचेंबरमध्ये त्यांची बराच वेळ चर्चा झाली तेव्हा वाले हे बाहेर आले असता पत्रकारांनी त्यांना विचारले, आमदार कल्याणशेट्टी हे माझे भाचे आहेत, आमच्या वैयक्तिक कामानिमित्त आम्ही त्यांची भेट घेतल्याचे सांगून प्रकाश वाले बाहेर पडले.
काँग्रेसच्या शहराध्यक्ष पद गेल्यापासून वाले हे काँग्रेस भवनमध्ये दिसले नाहीत, काही महिन्यांपूर्वी ते शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासोबत महाराष्ट्राच्या बाहेर दिसून आले. त्यामुळे वाले यांच्या मनात नेमकं काय चालू आहे. ते काँग्रेसलाही अजून समजलेलं नाही हे माञ नक्की.