सोलापूर : सोलापूरचे रहिवासी मात्र नांदेड येथे ड्युटीवर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद मळाले यांनी शनिवारी पहाटे स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेने सोलापूर आतील पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून मयताच्या खिशात सुसाईड नोट सापडल्याने हे प्रकरण आता गंभीर बनले आहे. मयताच्या पत्नीने पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले असून जोपर्यंत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन संबंधिताला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
शहरातील कुमठा नाका परिसरात राहणारे एपीआय आनंद मळाले यांनी कामाचा तणाव असल्याने शनिवारी सकाळी राहत्या घरात आत्महत्या केली. त्यांचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणण्यात आला आहे. त्यांच्या खिशामध्ये इंग्रजी भाषेत लिहिलेली चिट्ठी सापडल्याने खळबळ उडाली आहे.
माध्यमांशी बोलताना त्यांच्या पत्नीने एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यावर गंभीर आरोप केले असून त्यांच्या त्रासाला कंटाळून माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली आहे ते मागील काही दिवसापासून तणावात होते. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून संबंधिताला अटक करावी अशी मागणी केली.
मयताचे मित्र विशाल शिंगाडे यांनी या प्रकरणात ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करून आरोपीला तात्काळ अटक करावी आणि मयताच्या पत्नीला नोकरीवर घ्यावे अशी मागणी केली.