सोलापूर : सोलापूर शहर असो किंवा महाराष्ट्र व देशातील इतर जिल्हे असो, शिव्या मात्र सारखेच असतात. शिवीगाळ करत मित्र एकमेकांच्या आई बहिणीला सर्रास शिव्या देताना आढळतात. मित्र एकमेकांना बोलताना सहजच आईवर शिव्या देतात. वादविवादात तर अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याच अनेकदा पाहायला मिळते. या शिव्या नाहीशा व्हाव्यात म्हणून तंजीम हमदर्द इंसानियत या सामाजिक संस्थेकडून शिवीमुक्त सोलापूर किंवा शिवी मुक्त कट्टा ही संकल्पना सुरू झाली आहे.
सोलापूर शहरातील विविध चौकात शिवी मुक्तचे बॅनर लावून जनजागृती सुरू झाली आहे. ज्या ठिकाणी तरुण मुलांचा बसण्याचा कट्टा आहे, ज्याठिकाणी महाविद्यालये आहेत त्या ठिकाणी शिवी मुक्त कट्टाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
एखाद्या पुरुषाच्या शरीरातील वीस हाड एकत्रित तोडल्यातर जितक्या वेदना होतात तितक्याच वेदना एखाद्या मुलाला जन्म देताना त्या आईला सहन कराव्या लागतात.जन्माला आल्या नंतर अनेक हालअपेष्टा सहन करत मुलाला तरुण केलं जात आणि तोच मुलगा मित्रांसोबत असताना शिव्या खातो किंवा दुसऱ्या मित्राला आई बहिणी वर शिव्या देतो. अशी शिविगाळ करणे किंवा शिवराळ भाषेत बोलने हे योग्य नव्हे अशी जनजागृती सोलापुरात सुरू झाली आहे.