सोलापुरात घुसू लागले गरिबांच्या घरात पाणी ; ती रात्र काढावी लागते जागून ; कडक शिस्तीच्या आयुक्त मॅडम लक्ष देतील का?
सोलापूर : शहरातील माता रमापती आंबेडकर नगरामध्ये मागील अनेक दिवसांपासून नळाचे पाणी आणि ड्रेनेजचे पाणी एकत्रित होऊन गोरगरीब नागरिकांच्या घरात घुसते. त्यामुळे ती संपूर्ण रात्र जागून काढावी लागत असल्याचे चित्र आहे.
काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशाच्या संयोजिका संध्या काळे व शहराध्यक्ष प्रमिला तुपलवंडे यांनी याप्रकरणी त्या भागात जाऊन भेट दिली महिलांनी त्यांच्यासमोर महापालिका प्रशासनाच्या विरोधात अनेक तक्रारी मांडल्या.
रमापती आंबेडकर नगरात आठवड्याला एकदा पाणी येते परंतु ते पाणी रात्रीच्या सुमारास आल्याने त्याच वेळेस ड्रेनेजचे आणि नळाचे पाणी पाईपलाईन मधून लिकेज होऊन ते तसेच या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या घरात घुसते घरामध्ये कमरे एवढे पाणी साठल्याने त्या दिवशीची रात्र अख्खी जागून काढावी लागत असल्याचे चित्र आहे. त्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे ज्यावेळेस काही पत्रकारांनी ही समस्या घेण्यासाठी तिथे गेले असता महिलांनी महापालिकेच्या विरोधात संताप व्यक्त केला.
संध्या काळे यांनी कडक शिस्तीच्या असलेल्या महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांनी महिलांचे या समस्या जागेवर येऊन जाणून घ्याव्या, तातडीने प्रशासनाला सूचना कराव्यात अन्यथा या सर्व महिलांना घेऊन महापालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.