सोलापुरात या रिपाइं गटाचा आमदार प्रणिती शिंदे यांना बिनशर्त पाठिंबा
सध्या देशामध्ये १८ व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीत प्रामुख्याने दोन मोठे पक्ष असून भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्त्वाखाली एन.डी.ए. आणि काँग्रेस पक्षासह इतर घटक इंडिया आघाडी असे दोन प्रवाह निवडणुकीमध्ये उतरले आहेत.
परंतु गेल्या दहा वर्षांमध्ये सत्तेवर आलेले भारतीय जनता पार्टीचे सरकार पूर्णपणे सर्वच क्षेत्रामध्ये अयशस्वी झाले आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये दिली गेलेली अनेक आश्वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, बेरोजगारी, कामगारांची व्यथा, १५ लाख रूपये जमा करण्याचे आश्वासन ते पूर्ण करू शकले नाहीत. महागाई, गॅस, पेट्रोल, डिझेल, जी.एस.टी. अशा अनेक प्रश्नांवर जनतेची नाराजी तसेच जातीयवादाचा कळस, दलित-मुस्लिम अथवा सर्वसामान्य हिंदूचे जीवन सुध्दा धोक्यात आहे आणि त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) च्या वतीने सोलापूर लोकसभा मतदार संघातील उमेदवार या इंडिया आघाडी राष्ट्रीय पातळीवर असून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट) व अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने जाहिर पाठिंबा देण्याचे काल झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये घेण्यात आला असून त्यासाठी संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदार संघातील कार्यकर्ते हे कामाला लागलेले असून सुशासन आणि जनतेला न्याय देणाऱ्या इंडिया आघाडीच्या व महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन पत्रकार परिषदेमध्ये सुबोध वाघमोडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस जक्काप्पा कांबळे, धर्मा माने, सलिम मुल्ला, संघराज बिराजदार, सिकंदर शेख, माणिक आठवले, शहर महिला अध्यक्षा पुनम मोरे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.