सोलापूर : यंदा पाऊस समाधानकारक असून, परिस्थिती जैसे थे राहणार असल्याचे भाकित सिद्धेश्वर यात्रेतील मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केले.
सोमवारी मध्यरात्री होम प्रदीपन सोहळा आटोपल्यावर सातही नंदीध्वज मिरवणुकीने डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहासमोरील भाकणूकस्थळी आले. एका रांगेत सातही नंदीध्वज विसावले अन् दिवसभर उपासी ठेवलेल्या मानकरी देशमुख यांच्या शेतातील वासराला सन्मानाने भाकणूकस्थळी आणले.
मानकरी राजशेखर हिरेहब्बू आणि मानकरी राजशेखर देशमुख यांनी वासराची विधिवत पूजा केली. वासरासमोर गूळ, विविध प्रकारचे धान्य, ऊस, सुपारी, गाजर, पान, खारीक आदी खाद्य ठेवण्यात आले होते. वासरान गूळ आणि गाजराला स्पर्श केला. त्यामुळे लाल वस्तू या महागणार असल्याचे राजशेखर हिरेहब्बू यांनी सांगितले.
वासरानं मूूत्र विसर्जन केलं. यावरून यंदा समाधानकारक पाऊस असल्याचे हिरेहब्बू यांनी सांगितले. यावेळी सुधीर देशमुख, सुदेश देशमुख, सिद्धेश थोबडे यांच्यासह नंदीध्वजधारक, भक्तगण उपस्थित होते.