अडकलो रे बाबा ! तत्कालीन शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारुती फडके अडचणीत ! उपसंचालकांचे चौकशीचे आदेश
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेच्या तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारूती फडके यांच्या कार्यकाळात अल्पसंख्यांक मान्यतेचे चौकशीचे आदेश उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिले आहे. चौकशी केल्याशिवाय संबंधितांना शालार्थ आय डी देऊ नका असा आदेश दिला आहे. त्यामुळे तत्कालीन शिक्षणाधिकारी यांनी पदभार सोडला असला तरी चौकशीचे सत्र मात्र त्यांच्या मागे लागले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या २ फेब्रुवारी २०२३ च्या पत्रानुसार राज्यात २६५ अतिरिक्त शिक्षकांना समायोजित करण्याच्या अटीवर १४७४ रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण संचालक यांना पुढील कार्यवाहीसाठी कळविलेले होते. त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात अल्पसंख्यांक शाळामध्ये १५ शिक्षक अतिरिक्त असून त्यांचे अद्यापही समायोजन झालेले नाही. अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन न करता अल्पसंख्यांक शिक्षकांच्या मान्यता तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे व मारूती फडके यांनी दिलेल्या आहेत. त्या सर्व मान्यतांची तात्काळ चौकशी करून त्यास सर्वस्वी जबाबदार असलेल्या अंधारे व फडके यांच्यावर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नागटिळक व बहुजन हक अभियान संघटनेचे दयानंद बनसोडे यांनी शिक्षण उपसंचालक, पुणे यांच्याकडे केली होती.
या मान्यता देताना पूर्वी दाखल केलेल्या प्रस्तावांना मान्यता न देता तसेच उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशानुसार मान्यता न देता काही ठराविक शाळेतील मान्यता देण्यात आलेल्या होत्या. यामध्ये मान्यता प्रस्ताव सादर केलेले आवक-जावक, शालार्थ प्रस्ताव पाठविलेले दिनांक याची संपूर्ण चौकशी केल्याशिवाय संबंधित कर्मचाऱ्यांचे शालार्थ आयडी देऊ नयेत व संबंधित अधिकाऱ्याऱ्यांवर प्रशासकीय कार्यवाही करावी अशी मागणी देखील पत्रात केली होती. जिल्ह्यामध्ये अल्पसंख्यांक शाळामधील अतिरिक्त शिक्षक किती होते? त्यांचे समायोजन झाले आहे काय? नसल्यास समायोजन न करता वैयक्तिक मान्यता देण्यात आलेल्या आहेत काय? शासन पत्र २८ ऑगस्ट २०२३ मधील दिलेल्या निर्देशानुसार वैयक्तिक मान्यता देताना मुद्दा क्र.१ नुसार कार्यवाही करण्यात आलेली आहे काय? वैयक्तिक मान्यता देताना मुद्दा क्र.२ नुसार माहिती या कार्यालयास सादर करावी, वैयक्तिक मान्यता देताना शासन निर्णय १० जून २०२२ नुसार कार्यवाही केली आहे काय? जाहिरात दिलेली आहे काय? वरील सर्व मुद्यांची सखोल चौकशी करून स्वतंत्र मुद्देनिहाय अहवाल स्वयंस्पष्ट अभिप्रायासह उपसंचालक कार्यालयास सादर करण्याचे निर्देश शिक्षण उपसंचालक यांनी दिलेले आहेत.