अय्यो.., सोलापूर झेडपीच्या कार्यकारी अभियंत्याला म्हणे चावला उंदीर….
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अनेक मजेदार गोष्टी ऐकायला मिळतात, पहायला मिळतात. आणखी एक मजेदार बाब ऐकण्यास मिळत असून जिल्हा परिषदेतील एका कार्यकारी अभियंत्याला चक्क उंदीर चावला आहे.
सध्या जिल्हा परिषदेमध्ये मार्च एंड तसेच लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिता लागण्याच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांची लगबग सुरू आहे. 2022 23 चा निधी खर्ची पडण्यासाठी प्रशासकीय मान्यता, वर्क ऑर्डर कामकाज अतिशय वेगाने झाले. फायलिंग चा निकाल करण्यासाठी कार्यकारी अभियंत्यांची पळापळ पाहायला मिळाली.
या गोंधळातच एक कार्यकारी अभियंता आपल्या लेखाधिकारी यांच्या कक्षात फाईल पाहताना त्यांना एक उंदीर चावला. उंदीर चावल्याची बातमी त्या विभागात पसरली. त्याच कार्यकारी अभियंताचा मित्र असलेला दुसरा कार्यकारी अभियंता यांनी आपल्या मित्राची काळजी करत तात्काळ इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. या उंदीर चावल्याच्या घटनेने घाबरलेल्या त्या कार्यकारी अभियंत्याने लगेच इंजेक्शन देऊन स्वतःला दिलासा दिला.
सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये उंदरांसोबतच कुत्र्यांचा ही सुळसुळाट पाहायला मिळतो. मागील काही महिन्यांपूर्वी तर आरोग्य विभागामध्ये कुत्रा मरून पडल्याचे ऐकण्यास मिळाले होते. त्यामुळे आता जिल्हा परिषदेमध्ये पेस्ट कंट्रोल करून उंदीर घूस तसेच इतर कीटकांचा नायनाट व्हावा यासाठी प्रशासन पुढाकार घेणार का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.