सोमनाथ वैद्य भेटले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ; ही केली मागणी ; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून आपली मोर्चे बांधणी करत असलेले सोमनाथ वैद्य यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. दरम्यान या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ही भेट नक्की कशासाठी असे प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र वैद्य यांनी मागील काही दिवसात दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
दक्षिण सोलापुर विधानसभा मतदार संघातील दि. १ सप्टेंबर व २ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या संततधर पावसामुळे खरीप पिकांचे अत्यंत नासधूस झालेले असून येत्या काही दिवसात काढणीला येणा-या पिकांचे नुकसान झालेले आहे. गेल्या दोन महिन्यापुर्वी या भागातील शेतक-यांनी मृग नक्षत्रांवर आघाडीने ३० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरण्या केल्या होत्या त्यासाठी प्रति एकरी वीस ते पंचेवीस हजार रुपये खर्च करण्यात आला होता. या भागातील शेतकरी अत्यंत गरीब असून शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह सुरु आहे. गेल्या २ दिवसात झालेल्या संततधार पावसामुळे काढणीला आलेल्या उडीद, तुर, मका, लिंबू, कांदा तत्सम पिकाच्या उत्पादनांमध्ये ८०% पेक्षा घट होणार आहे. त्यामुळे येथील शेतकरी व त्यावर आधारीत सर्व रोजगारी लोकांचे आर्थीक गणित बिघडणार आहे.
तरी जिल्हाधिकारी सोलापूर यांना आपल्या स्तरावरुन तात्काळ आदेश होवून दक्षिण सोलापूर येथील शेतक-यांचे संततधर पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे स्थानीक आपत्ती घटकांतर्गत पंचनामे आदेश निर्गमित करुन प्रती एकरी २५ हजार अग्रीम मदत देणेबाबत आदेश व्हावेत. व झालेल्या पिकांचे नुकसान पंचनामे करणेबाबत कृषी विभाग यांना आदेश करावेत अशी मागणी केली आहे.