सोलापूरच्या उर्दू घरचे गुरुवारी लोकार्पण ; सायंकाळी ‘शाम ए सुखन’ कार्यक्रमाचे आयोजन
सोलापूर : सोलापुरातील उर्दू घर या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी सकाळी अकरा वाजता राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार अशी माहिती अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर व प्रांताधिकारी सदाशिव पडदूणे यांनी दिली.
उर्दू घराच्या उद्घाटनानंतर सायंकाळी सात वाजता ‘शाम ए सुखन’ या उर्दू शायरी व मुशयऱ्यांचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. राजेश रेड्डी, इरफान शहानुरी, शकील आजमी, सीराज सोलापूरी, मोनिका सिंग ठाकूर, प्रज्ञा शर्मा, विशाल बाग, अनंत नांदुरकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम रंगणार आहे.
2014 या सालामध्ये सोलापुरात सिव्हील हॉस्पिटल समोरील जागेत या उर्दू घराचा भूमिपूजन समारंभ पार पडला होता. तब्बल दहा वर्षानंतर ही इमारत आता लोकांच्या सेवेत सुरू होणार आहे. मागील काही महिन्यांपासून प्रांताधिकारी सदाशिव पडदूने यांनी यासाठी बरेच प्रयत्न केले आहेत. या ठिकाणी सुमारे 200 नागरिकांच्या बसण्याची सोय असलेले सभागृह असून वर्षभरात विविध भाषांचे पुस्तक प्रकाशन सोहळ्यांसाठी हे सभागृह उपलब्ध होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.