सोलापूरची शिवजन्मोत्सव मध्यवर्ती भेटली महापालिका आयुक्तांना ; 31 मे पर्यंत हे काम पूर्ण करा
सोलापूरच्या शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे, उत्सव अध्यक्ष सीए सुशील बंदपट्टे, श्रीकांत डांगे, श्रीकांत घाडगे, आप्पा सपाटे, तात्या वाघमोडे, विजय भोईटे, अंबादास शेळके, दिनकर जगदाळे, विश्वनाथ गायकवाड, सचिन स्वामी, प्रकाश ननवरे, गणेश डोंगरे, नागेश वडणे, देविदास घुले यांची उपस्थिती होती.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळ्याचे मजबुतीकरणाचे काम चालू आहे. यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये सदर काम १९ फेब्रुवारी २०२५ पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन सोलापूर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले होते परंतु तसे झाले नाही आणि काम पूर्ण करण्यास विलंब झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड नाराजी होती. तरीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शिवभक्तांनी मोठ्या सामंजस्याने साजरी केली.
येत्या ०६ जून २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिवस असून सदर काम वेळेत पूर्ण करण्यात यावे अशी मागणी असून महापालिका आयुक्तांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे बंदपट्टे यांनी सांगितले.