अरे व्वा ! रेल्वे स्टेशनवर थंड पाणी ते ही मोफत ; केतन वोरा मित्र परिवार सरसावला !
वाढता उन्हाळा लक्षात घेता रेल्वे स्थानकावर येणारे प्रवासी तसेच स्थानकावर थांबणाऱ्या गाड्यांमधील प्रवाशांना थंडगार पाणी तेही मोफत मिळणार आहे. सोलापुरातील केतन वोरा मित्र परिवाराने हा उपक्रम राबविला आहे.

रेल्वे स्थानकावर गाडी थांबली तर प्रवासी उतरतो तो केवळ पाण्याची बाटली घेण्यासाठी. आता प्रवाशांना उतरल्यावर लगेच समोर पाण्याचे जार दिसणार असून त्यात थंडगार पाणी मिळणार आहे.
एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या मोफत पेयजल सेवेचा शुभारंभ सिनिअर डीसीएम योगेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यांनी स्वतः या जार मधील पाणी पिऊन हा शुभारंभ केला. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. रेल्वे गाडी थांबताच प्रवाशांचे पावले या थंड पाण्याकडे वळाली आणि प्रवाशांनी पाणी पिऊन आनंदाचा ढेकर दिला.
योगेश पाटील यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना केतन वोरा मित्र परिवाराच्या कार्याचे कौतुक केले. प्रवाशांनी थंड पाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
यावेळी स्टेशन मॅनेजर मीना, अतुल लोहकरे, व्यावसायिक कार्यालयातील पांडा, नंदकिशोर आसावा, नीलेश आसावा, केतन व्होरा, सामाजिक कार्यकर्त्या चंद्रिका चौहान यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.