ज्येष्ठ काका साठेंना प्रदेशवर संधी ; वसंत नाना देशमुख राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष
सोलापूर : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने संघटनात्मक बदल करण्यात येत असून सोलापूर जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बढती देण्यात आले असून त्यांच्या जागेवर पंढरपूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख यांना जिल्हाध्यक्ष पदावर संधी देण्यात आले आहे.

2018 पासून बळीराम साठे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत पक्षाची वाताहात होत असताना काका साठे यांनी जिल्हाध्यक्ष पद सांभाळून पक्षाला उभारी दिली. त्यानंतर पक्षामध्ये फूट पडली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले.
आता काका साठे यांना पक्षाने प्रदेशवर काम करण्याची संधी दिली आहे. त्यांना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून बढती देण्यात आली आहे. त्यांच्या जागेवर यापूर्वी प्रशांत परिचारक यांचे समर्थक मानले जाणारे आणि कासेगाव जिल्हा परिषद गटातून जिल्हा परिषद सदस्य झालेले वसंत नाना देशमुख यांच्या खांद्यावर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे.
राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांना जिल्हाध्यक्ष पद मिळाल्याने त्यांनी त्यांच्या हस्ते आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील आमदार उत्तम जानकर यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष पदाचे पत्र घेतले.