सोलापूर महापालिकेच्या प्रशासकीय कारभाराची देवेंद्र कोठेंकडून फडणवीसांकडे तक्रार
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर दौऱ्यावर असून सकाळी 11 वाजता त्यांचे सोलापूर विमानतळावर आगमन झाले यावेळी त्यांना माजी नगरसेवक भाजपने युवा नेते देवेंद्र कोठे यांनी निवेदन देऊन सोलापूर महानगरपालिकेच्या कारभाराची तक्रार केली.
कोठे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे की,
सोलापूर महानगरपालिकेत मागील अडीच वर्षापासून प्रशासकीय कारभार सुरू आहे. अलीकडच्या काळात कामकाजातील ढिसाळपणा वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये आपल्या पक्षाविषयी देखील नाराजीचे सूर उमटत आहेत. तरी महोदयांनी खाली कधी नमूद विषयांच्या बाबतीत गांभीर्याने दखल घेत महापालिकेचा कारभार सुधारणेकामी संबंधितांना आपल्या स्तरावरून आदेश द्यावेत ही विनंती.
०१) यंदा राज्यात भरपूर पाऊस पडतोय. उजनी धरण देखील जवळपास 80 टक्के भरलेले आहे. अशा परिस्थितीत देखील शहरातील पाणीपुरवठा चार ते पाच दिवसाआड सुरू आहे. तरी कृपया *दोन ते तीन दिवस आड पाणीपुरवठा व्हावा* असे आदेश द्यावेत.
०२) शहरातील कचरा संकलनाबाबतीत अलीकडच्या काळात तक्रारी वाढलेल्या असून माध्यमांमध्ये राज्यस्तरावर याविषयीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. तरी *कचरा संकलन नियमितपणे होणे* गरजेचे आहे.
०३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटीतून पूर्ण झालेली कामे महानगरपालिकेकडे वर्ग केल्यानंतर बंद अवस्थेत आहेत. त्यांच्या देखभाल दुरुस्तीचा विषय देखील गंभीर बनत चालला आहे. त्यादृष्टीने लक्ष देऊन तरतूद करणे आवश्यक आहे.
०४) बंद पडलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती लवकर केली जात नाही. संबंधित मक्तेदारांवर पालिकेच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याचे वारंवार जाणवते. पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यांवर पाणी साचते आणि अशावेळी दिवे बंद राहिल्यास अपघाताची शक्यता वाढते.
०५) पावसाळ्यात अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे पाहायला मिळते. हद्दवाढ भागात तर सर्वत्र चिखलमय रस्ते पाहायला मिळतात. अशावेळी *प्रीमिक्स आणि मुरूम गरजेनुसार त्वरित उपलब्ध करून दिला जावा.*
०६) रस्ते स्वच्छ करण्याकरिता मोठ्या रकमेचा मक्ता मंजूर झालेला असून शहरातील धुळीचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने हे काम चोखपणे केले जाणे अपेक्षित आहे. मात्र, अनेक रस्त्यांच्या दुभाजका शेजारी मोठ्या प्रमाणात माती साचल्याचे पाहायला मिळते. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे यावर नियंत्रण अपेक्षित आहे.
वरील बाबी शहरवासीयांच्या दृष्टीने रोजच्या व्यवहारात अडचणी जाणवून देणाऱ्या ठरतात, त्यामुळे या बाबतीत सुधारणा झाल्यास निश्चित त्याचा फायदा आगामी काळात शहर सुधारणेला होऊन नागरिकांचे आशीर्वाद आपल्या सोबत राहतील अशी खात्री वाटते. तरी महोदयांनी त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना आदेश द्यावेत ही विनंती. आपली अनुमती मिळाल्यानंतर आम्हीही आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन याबाबतीत चर्चा करू.