सोलापूर बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया थांबवली ! या तारखेपर्यंत पुढे ढकलली
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती या निवडणुकीसाठी सात ते 11 ऑक्टोबर दरम्यान अर्ज विक्री आणि स्वीकृती तसेच 14 ऑक्टोबर रोजी अर्ज छाननी आणि 10 नोव्हेंबरला मतदान 11 नोव्हेंबर रोजी मतमोजणी असा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. सोमवारी जिल्हा उप निबंधक कार्यालयात अर्ज विक्री सुरू झाली. परंतु बाजार समितीची निवडणूक विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आता 31 डिसेंबर 2024 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे तसे आदेश राज्याच्या पणन विभागाने काढले आहेत.
राज्यातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूकांचे अधिक्षण, निर्देशन व नियंत्रण करण्याची जबाबदारी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणावर सोपविलेली आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने संबंधित जिल्हयातील कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका घेण्याकरीता जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांना जिल्हा निवडणूक अधिकारी (कृ.उ.बा.स.) म्हणून घोषित केलेले आहे.
ज्याअर्थी, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थाच्या कार्यालयातील तसेच सहाय्यक निबंधक यांचे कार्यालयातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी यांचे आगामी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कामकाजासाठी नियुक्तीचे आदेश संबंधित जिल्हाधिकारी यांनी काढल्याने, निवडणूकीस पात्र असणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यामध्ये अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे अडचणीचे होणार आहे.
ज्याअर्थी, कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका महाराष्ट्र राज्यातील सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ ची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर घेणे क्रमप्राप्त आहे, असे शासनाचे मत झाले आहे.
महाराष्ट्र कृषि उत्पन्न पणन (विकास व विनयमन) अधिनियम १९६३ मधील कलम १४(३) (अ) च्या तरतूदीअन्वये प्राप्त अधिकारांनुसार महाराष्ट्र शासन असे आदेश देत आहे की:-
“ज्या कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूक प्रक्रिया मा. न्यायालयाच्या निर्णयानुसार घेणे क्रमप्राप्त आहे अशा बाजार समित्यांच्या निवडणूका वगळून उर्वरित सर्व कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणूका या आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील त्या टप्प्यावर स्थगित करुन दि.३१ डिसेंबर, २०२४ पर्यंत पुढे ढकलण्यात येत आहेत. ”