सोलापूरच्या दिलीप माने यांचा इरादा पक्का ! या दिवशी करणार मुंबईत काँग्रेस प्रवेश
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारी याद्या फायनल होत आहेत. अनेक राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात उड्या मारत आहेत. सर्वाधिक ओढा हा शिवसेना आणि भाजप या पक्षाकडे असताना सोलापुरात मात्र काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे पुन्हा स्वगृही परतणार आहेत. त्यांनी आपला इरादा पक्का केला असून येत्या 31 मार्च रोजी मुंबईमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत माने काँग्रेस प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. काँग्रेस पक्षाकडूनही त्याला दुजोरा देण्यात आला आहे.
मुंबईमध्ये दिलीप माने यांच्या काँग्रेस प्रवेश वेळी ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश हसापुरे हे नेते उपस्थित राहणार असल्याचे कळते.
2019 ची विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवल्या नंतर दिलीप माने हे शांतच राहिले, अजित पवारांच्या संपर्कात ते दिसून आले, राष्ट्रवादी कडून ते विधान परिषद लढवतील अशी चर्चा होती पण ती निवडणूक झालीच नाही. लोकसभेची निवडणूक लागल्यानंतर आपल्या नेत्याने ठोस भूमिका घ्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांमधून झाली. त्यामुळे माने यांनी उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर तालुक्यातील तसेच शहरातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन म्हणणे ऐकून घेतले. सर्वांच्या तोंडून मालकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश करून प्रणिती शिंदे यांना निवडून आणावे, आणि दक्षिण सोलापूर मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवावी अशी मागणी पुढे आली होती. माने यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे निश्चितच आमदार प्रणिती शिंदे यांना उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, शहरातील मते मिळण्यास मदत होणार आहे.