सोलापूर काँग्रेस के शेर, शहर मध्य मे हो गये ढेर
सोलापूर : लोकसभा निवडणुकीचा निकाल सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरला आहे. काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीला हॅट्रिक पासून रोखत आपला विजय संपादन केला. त्यांनी आपल्या आई उज्वला शिंदे आणि वडील सुशीलकुमार शिंदे यांच्या पराभवाचा वाचपा या निवडणुकीत काढला आहे.
प्रणिती शिंदे या मागील पंधरा वर्षांपासून सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघाच्या आमदार आहेत. 2009 च्या निवडणुकीत त्या पस्तीस हजारहून अधिक मताधिक्याने विजय झाल्या होत्या. 2014 च्या निवडणुकीत त्या साडेनऊ हजार मतांनी विजयी झाल्या तर 2019 च्या निवडणुकीत त्या पंधरा हजार पेक्षा अधिक मतांनी विजयी झाल्या होत्या. लोकसभेच्या मागील दोन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला शहर मध्य मधून 25 ते 30 हजाराचे मताधिक्य मिळाले होते. या मतदारसंघाच्या तीन टर्म आमदार असलेल्या प्रणिती शिंदे लोकसभा निवडणुकीत उमेदवार असल्याने त्यांना काँग्रेस सह भाजपच्याही कार्यकर्त्यांना मध्य मधून किमान 20 ते 25 हजाराचे मताधिक्य अपेक्षित होते.
या मतदारसंघात काँग्रेसचे सर्वाधिक नगरसेवक होते. स्वतः शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे याच मतदारसंघातील आहेत. माजी नगरसेवक विनोद भोसले, माजी महापौर आरिफ शेख, माजी नगरसेवक रियाज हुंडेकरी, युवकचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे, विद्यमान युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, माजी नगरसेवक नरसिंग कोळी, माजी नगरसेवक तोफीक हत्तुरे, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष जुबेर कुरेशी, शहराच्या अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे, माजी महापौर संजय हेमगड्डी, माजी नगरसेवक देवेंद्र भंडारे, अल्पसंख्यांक युवक अध्यक्ष नजीब शेख, मध्य अध्यक्ष वाहिद बिजापुरे एवढी मोठी ताकद मध्य या मतदारसंघात आहे. माजी आमदार प्रकाश यलगुलवार हे तर दोन टर्म आमदार राहिले आहेत.
असे असतानाही शिंदे यांना केवळ 790 इतकेच मताधिक्य मिळाले. यावरून काँग्रेसचे काही दिग्गज नेते आपल्या मतदारसंघात फेल गेले असून काँग्रेस शहराध्यक्ष यांच्या भागात भाजपला लीड असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. मुस्लिम भागातील प्रत्येक बुथवर तब्बल 75 टक्के मते ही काँग्रेसला पडल्याचे पाहायला मिळते त्यामुळे या समाजाने काँग्रेस पक्षाला भरभरून मतदान केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
निवडणुकी दरम्यान माजी महापौर महेश कोठे यांचे पुतणे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांच्यावर पक्षाने ‘शहर मध्य’ची जबाबदारी दिली होती. याबाबत कोठे म्हणाले, मला पक्षाने दिलेली जबाबदारी मी प्रामाणिकपणे पार पाडली आहे. उलट आम्ही मध्य मध्ये काँग्रेसला डॅमेज कंट्रोल केले, उमेदवार या विद्यमान आमदार आहेत, या निवडणुकीत त्यांना किमान 25 हजाराचे मताधिक्य अपेक्षित होते. ते मताधिक्य आम्ही मिळू दिले नाही. त्यांना केवळ आठशे ते हजार मताधिक्यावर आम्ही थांबवले. पूर्व भागात भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात लीड मिळाला आहे, आम्हाला मिळालेल्या मोजक्या दिवसातच आम्ही जबाबदारी चोख बजावली, मताचे आकडे पाहिले असता उलट काँग्रेसचेच नेते या मतदारसंघात आपल्या नेत्याला मताधिक्य मिळवून देण्यात अपयशी ठरले असे म्हणावे लागेल.