पोलीस आयुक्तालयाची कारवाई ; सराईत गुन्हेगार माशाळकर व वालेकर दोन वर्षासाठी तडीपार
सोलापूर : आगामी काळात विविध जाती-धर्माचे सण-उत्सव, मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सराईत गुन्हेगार वैजिनाथ उर्फ बबलु सुरेश वालेकर (वय-२९ वर्षे) याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून ०२ वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय.
तसेच सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशनसह अन्य पोलीस ठाणे हद्दीत तसेच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार गणेश कल्लप्पा माशाळकर (वय- २४ वर्षे, रा. लिमयेवाडी, साई मंदिर जवळ, रामवाडी, सोलापूर) याला त्याच्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाने त्यास सोलापूर शहर उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलंय.
वैजिनाथ उर्फ बबलु सुरेश वालेकर (रा. कामती खुर्द, ता. मोहोळ) याच्याविरूध्द सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण हद्दीतील सोलापुर तालुका आणि कामती पोलीस ठाणे परिसरात गुंडगिरी करणे, शिवीगाळ दमदाटी व मारहाण करुन दहशत निर्माण करणे तसेच त्या परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहचविणे व जबरी चोरी करणे अशा गंभीर स्वरूपाचे ०४ गुन्हे दाखल आहेत.
त्यामुळे त्याचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पोलीस उपायुक्त (परिमंडळ) यांचे आदेश पारित झाले होते. त्यास शनिवारी, ०९ मार्च रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापुर जिल्हा व उस्मानाबाद जिल्हातून ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.
गणेश माशाळकर याच्याविरुद्ध परिसरात गुंडगिरी करणे, शिवीगाळ दमदाटी व मारहाण करुन दहशत निर्माण करणे सदर परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहचविणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५७ (१) (अ) प्रमाणे मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ, यांचे आदेश पारित झाले होते. त्यास गुरुवारी, ०७ मार्च रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापुर जिल्हा व धाराशिव जिल्हातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.