विजय देशमुखांना शुभेच्छा नंतर सचिन कल्याणशेट्टी सिध्देश्वर दर्शनाला ; हा फोटो बराच काही सांगून गेला
सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या यादीत सोलापुरातील तीन विद्यमान आमदारांच्या उमेदवारीची घोषणा झाली. त्यामध्ये माजी पालक मंत्री तथा आमदार विजयकुमार देशमुख, माजी मंत्री तथा आमदार सुभाष देशमुख, जिल्हाध्यक्ष तथा आमदार सचिन कल्याण शेट्टी यांचा समावेश आहे.
सोमवारी आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर यांचे दर्शन घेऊन आपल्या कामाला सुरुवात केली. याच दिवशी विजयकुमार देशमुख यांचा वाढदिवस होता. अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी मात्र आमदार देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त आवर्जून उपस्थिती लावत त्यांचा सत्कार केला. कल्याणशेट्टी आल्याने निश्चितच मालकांना ‘आनंद’ झाला असेल.
या शुभेच्छा नंतर कल्याणशेट्टी यांनीही ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेत आरती केली.
लोकसभेनंतर महाराष्ट्रात तयार झालेले सामाजिक तसेच राजकीय समीकरणे पाहता यंदा भारतीय जनता पार्टीला ही विधानसभा निवडणूक अडचणीची जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच पक्षांतर्गत प्रचंड गटबाजी असून या आमदारांना ही निवडणूक सोपी नाही हे पण तितकेच खरे आहे.
शहर उत्तर मध्ये विजय देशमुख यांच्या विरोधात पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी बंड करण्याची तयारी ठेवली असून यांच्यापैकी एकाला उमेदवार करण्याचे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. मालकांच्या विरोधातील बरेच कार्यकर्ते बापू यांना मानणारे आहेत तर अक्कलकोट मध्ये कल्याणशेट्टी यांच्या विरोधात जाण्याची तयारी करणारे अनेक कार्यकर्ते हे विजय मालकाचे समर्थक मानले जातात, तसेच बापूंना विरोध करणारे काही कार्यकर्ते हे मालकांचे समर्थक असल्याचे पाहायला मिळते. त्यामुळे ‘मी भारी का, तू भारी’ यामध्ये दोन्ही देशमुख आणि कल्याणशेट्टी यांनी न जाता एकमेकांना मदत करून कसे निवडून येता येईल याकडे लक्ष द्यावे अन्यथा ‘तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती धुपाटणं आलं’ अशी अवस्था या तिन्ही आमदाराची होऊ नये म्हणजे झाले.