अखेर ठरले ! सोलापूर विमानतळाचे आता रविवारी लोकार्पण ; पंतप्रधान मोदी दिल्लीतून करणार उद्घाटन
नूतनीकरण झालेल्या होटगी रोडवरील सोलापूर विमानतळाचे उद्घाटन आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी दुपारी बाराच्या सुमारास व्हर्चूअल पद्धतीने होणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. सोलापुरात या उद्घाटन सोहळ्याला सोलापुरातील उद्योजक, व्यावसायिक, व्यापारी अशा विविध क्षेत्रातील शंभर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे.
26 सप्टेंबर रोजी हा उद्घाटन सोहळा पुण्यातून होणार होता पण वातावरण बिघाड मुळे तो पुढे ढकलण्यात आला. शेवटी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी महायुती सरकार हे उद्घाटन उरकून घेत आहे.
सोलापूर विमानतळावरून विमान सेवा सुरू करण्याच्या अनुषंगाने DGCA ची टीम विमानतळाची पाहणी व तपासणी करून गेली होती. यामध्ये विमानतळाचे नियमन आणि सुरक्षा निरीक्षण प्रणाली द्वारे सुरक्षितता आणि हवाई सक्षमता तपासणी डीजीसीए कडून करण्यात आलेली होती. विमान वाहतूक सुरू करण्याच्या अनुषंगाने असलेली सर्व मानके सोलापूर विमानतळ प्राधिकरण कडून पूर्ण करण्यात आलेली असल्यामुळे आज डीजीसीए कडून सोलापूर विमानतळावरून विमान उडणे व उतरण्याचे परवाना (लायसन्स) मिळाले आहे.